'जजमेंट'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :24-Apr-2019
'जजमेंट' या थरारक सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक पाहायला मिळतेय. 'माझ्या जीवाला धोका आहे इथे', रडवेल्या आवाजात ऐकू येणारा तेजश्री प्रधानचा संवाद आणि मंगेश देसाईची खलनायकी भूमिका सिनेमाबाबत उत्सुकता वाढवणारी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रथमच खलनायकाची भूमिका साकारत आहे. या सिनेमात मंगेश देसाई तेजश्री प्रधानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. जो आपल्या पत्नीची हत्या करतो. 15 वर्षानंतर वकिल होऊन ऋजुता (तेजश्री) आपल्या आईच्या हत्येची केस वडिलांविरोधात पुन्हा सुरु करते. तिला ही तिच्या आईप्रमाणे संपवण्यात येईल अशी धमकी मिळते. आता ऋजुताला न्याय मिळणार का? हे आपल्याला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.

 
'जजमेंट'च्या माध्यमातून तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत. तेजश्रीची भूमिकाही ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे, ही पर्वणीच ठरणार आहे. मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका साकारत असल्यामुळे त्याच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच समाजातील काही नकारात्मक बाबीही त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतील.
हा सिनेमा नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे. य समीर रमेश सुर्वे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. २४ मे रोजी 'जजमेंट' प्रदर्शित होणार आहे.