तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा
   दिनांक :24-Apr-2019
 
 
 नागपूर: भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात देशभरात तब्बल ५० प्रचार सभांना संबोधित केले. यात महाराष्ट्रातील २७ सभांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठी नागपुरातही २० ते २५ सभा घेऊन शहर पिंजून काढले.
नितीन गडकरी यांच्या आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, बिहार, दिल्ली, ओडिशा, छत्तीसगढ, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये सभा झाल्या. याशिवाय महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक, अमरावती, वर्धा, लातुर, सोलापूर, जालना, सांगली, माढा, पुणे, बारामती, मुंबई, रायगड, औरंगाबाद, शिरूर, मावळ या मतदारसंघांत त्यांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या महायुतीच्या उमेदवारांता झंझावाती प्रचार केला. नितीन गडकरी यांनी आपल्या मतदार संघात एकदा तरी प्रचाराला यावे, हा आग्रह एनडीएच्या उमेदवारांचा आहे. त्यामुळेच नागपूरची निवडणूक संपल्यानंतर एक दिवसही विश्रांती न घेता ते विविध राज्यातील प्रचारात व्यस्त आहेत.
 
 
 
प्रचार सभेतील भाषणातून नितीन गडकरी यांनी ५ वर्षात केलेल्या विकासकामांवर भर दिला. विशेषत: ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कसा स्वावलंबी होईल याकडे त्यांनी अधिक लक्ष वेधले. सभांमध्ये नितीन गडकरी यांच्याबद्दल सामान्य जनतेत प्रचंड आकर्षण दिसत आहे. त्यांच्या नवकल्पना ऐकण्यासाठी युवा वर्ग उत्सुक असल्याचे जाणवले. अमित शाह यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी गांधीनगरला आयोजित रॅलीतही त्यांचा सहभाग होता. उद्या, नरेंद्र मोदी यांचा वाराणशी मतदारसंघात रोड शो असून, त्यातही ते सहभागी होणार आहेत.