साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

    दिनांक :24-Apr-2019
 
मुंबई: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी करणारी याचिका एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे न्यायालयाने स्प्षट केले आहे.
 

 
 
 
साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपाने भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. त्यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांना निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये व त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी पीडितांच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर काल सुनावणी झाली.
 
याचिकाकर्त्यांची ही मागणी कायद्याला धरून नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला, तर आम्ही प्रज्ञािंसह यांना क्लीन चिट दिलेली आहे, असे एनआयएने स्पष्ट केले होते. आज या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने ही याचिकाच फेटाळून लावली. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणे, हा निर्णय न्यायालयाच्या अखत्यारित नाही. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे न्यायाधीश विनोद पडाळकर यांनी स्पष्ट केले.