साहेबराव कृत्रिम पायाच्या प्रतीक्षेत !
   दिनांक :24-Apr-2019

आठ महिने लोटूनही निर्णय नाही
नागपूर: एकेकाळी ताडोब्यातील व्याघ्र प्रकल्पाची शान असलेला साहेबराव नामक वाघ काही वर्षांपूर्वी शिकार्‍याच्या जाळ्यात अडकला. यावेळी त्याच्या एका पायाची बोटे कापून त्याला वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी वाचविले. आधी महाराजबाग आणि त्यानंतर गोरेवाड्याच्या प्राणीसंग्रहालयात त्याची रवानगी करण्यात आली. एका पायाची बोटे गमविल्याने अडखळत चालणार्‍या साहेबरावला कृत्रिम पाय बसविण्याची संकल्पना शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रृत बाभुळकर यांनी मागील वर्षी मांडली. परंतु तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याचे वृत्त हाती आले आहे. संबंधित अधिकार्‍यांशी संवाद साधला असता काहींना बोलायला वेळ नाही तर काही योग्य उत्तर देण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
 
 
 

 
 
 
थायलंडमध्ये हत्तीला कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून गोरेवाडा बचाव केंद्रातील पायाची बोटे गमावलेल्या ‘साहेबराव’ या वाघाला देखील कृत्रिम पाय बसवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो देशातील पहिला प्रयोग ठरला असता. मात्र, मागील आठ महिन्यांपासून या दिशेने काहीच हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे.
कृत्रिम पाय बसविण्याच्या उद्देशाने वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी साहेबरावला दत्तक देखील घेतले. थायलंडमध्ये हत्तीला लावण्यात आलेल्या पायामुळे तो हत्ती चालण्याइतपत सक्षम झाला. हाच प्रयोग डॉ. बाभूळकर यांनी या वाघाबाबत करण्याचे ठरवले. यासंदर्भात विदेशी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांनी शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी देखील केली आहे. मात्र शासकीय लालफितीशाहीत हा निर्णय अडकल्याने आत्तापर्यंत यावर कुठलाही निर्णय अथवा हा प्रयोग करण्याची मान्यता संबंधित खात्याकडून देण्यात आलेली नाही. जर या प्रयोगाला परवानगीच नव्हती तर पहिली तपासणी कशी काय केली, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.