२०२३ पर्यंत माओवाद समूळ नष्ट करणार
   दिनांक :24-Apr-2019
२०१३ पर्यंत नक्षलवाद, माओवादाला मुळातून उपटून फेकण्यात येईल, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह कडाडले.
झारखंडमध्ये चौथ्या टप्प्याच्या प्रचारार्थ एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते आले असता, त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. पलामू येथील भाजपा उमेदवार विष्णुदयाल राम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथिंसह म्हणाले, कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा येथे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांना देशाच्या सुरक्षेशी काहीही घेणेदेणे नाही.
 

 
 
माओवादाला त्यांचे अप्रत्यक्ष समर्थन आहे. आज आम्ही राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले असून आज मोदींच्या उंचीचा एकही नेता विरोधकांजवळ नाही. आम्ही ठरवले होते, आधी फायर करायचा नाही. पण, तिकडून एक गोळी आली तर त्याचे उत्तर दहा गोळ्यांनी देऊ हे आमचे धोरण ठरले आहे. आम्ही त्यामुळेच आमच्या सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्णपणे मोकळीक दिली आहे. पुलवामाचा बदला आम्ही कशा पद्धतीने घेतला, हे जगजाहीर आहे.
मोदी सरकारच्या काळात उज्जवला योजना, सर्वांसाठी घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, झारखंडमध्ये मूलभूत सुखसोयी आणि विकास घडून आला. आगामी २०२० पर्यंत आम्ही प्रत्येक गरिबाला आर्थिक रेषेच्या वर आणण्याचा संकल्प केला आहे. आमच्या जाहीरनाम्यातून त्याचे भरीव आश्वासन आम्ही दिले आहे. झारखंडमधील पलामू आणि लोहारडग्गा येथे आगामी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.