विठ्ठलाचा नव्वदीतील योगजागर!
   दिनांक :24-Apr-2019
नागपूर: भल्या भल्या उत्साही तरुणांनाही लाजवेल अशी दुदर्म्य इच्छाशक्ती बाळगून योग वि÷ठ्ठल... श्वास वि÷ठ्ठल... असा जप करणार्‍या, नागपूर नगरीला भूषण असलेल्या कलीयुगातील एका विठ्ठलाचे वयाच्या ९० व्या वर्षातही योगजागराचे काम अवितरपणे सुरू आहे. हो... हे योगतपस्वी म्हणजे हनुमाननगरात राहणारे डॉ. विठ्ठलराव जिभकाटे होय.
चालते बोलते योग विद्यापीठ अशी ओळख असलेले डॉ. विठ्ठलराव जिभकाटे २५ एप्रिल रोजी वयाची ९० वर्ष पूर्ण करीत असून, ९१ वर्षात प्रदार्पण करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील चिचाळ येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणामध्ये फारशी गोडी नसताना व मॅट्रीकपर्यंत चार वेळा अपयश मिळविल्यानंतरही जिद्द न सोडता वयाच्या २२ व्या वर्षी ते मॅट्रीक झाले. ४६ व्या वर्षी बी. ए. तर ६४ व्या वर्षी एम. ए. व ७५ व्या वर्षी योग या विषयात त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली.
 
 
 
 
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाशी १४९५१ मध्ये डॉ. जिभकाटे यांचा संपर्क आला. या मंडळापासून त्यांनी योगकलेची प्रेरणा घेत योग प्रचाराचे व्रत स्विकारले जे आजही अव्याहतपणे सुरू आहे. चंदीगड, दिल्ली, मुंबई, नागपूर, अमरावती, सांगली, ठाणे, औरंगाबाद, नाशिक येथे योगसेवा देत त्यांनी आतापर्यंत 5 हजार योग शिबिरे घेतली. जागतिक, प्रांतीय, भारतीय योग क्रीडा आदी संबंधी अधिवेशनातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. दिल्ली येथील त्यांची योगप्रात्यक्षिके पाहून १९९७ मध्ये त्यांना दक्षिण कोरिया येथे जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी ३७ राष्ट्रांमधील जवळपास ७०० लोकांनी त्यांच्या योगविद्येची कला समजून घेतली, ही घटना त्यांचासाठी कायमच गौरवाची राहिली आहे.
केवळ योग प्रात्यक्षिके करणे यावर भर न देता डॉ. जिभकाटे यांनी विद्यार्थी, शिक्षक, महिला, व्यापारी, ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपयोगी ठरणारी आरोग्य आणि योगावर जवळपास ३५ पुस्तके लिहिली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी आपली पुस्तके बाजारात कधीही विक्रीसाठी ठेवली नाहीत. योगशिबिरात सर्वांना ही पुस्तके मोफत वितरीत केली. त्यांच्या या योगप्रचाराच्या कार्याची दखल घेत त्यांना मा.बा. गांधी स्मृती पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, मनपाचा पतंजल योग पुरस्कार, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, उत्तर लेखक पुरस्कार व विदर्भ भूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. असा हा योगतपस्वी योगाच्या माध्यमातून आजही लोकांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
किमान १० मिनिटे स्वतःसाठी द्या
शरीराला व्यायामासन, आरोग्यासन, चिकित्सासन तर मनाला समाधानासन, सौजन्यासन, नम्रतासन, प्रामाणिकासन व वचनबद्धासनाची आवश्यकता आहे. त्यामुळे पैसा कमवा, मान कमवा पण दिवसभरातून किमान 10 मिनिटे स्वतःसाठी द्या आणि शरीर व मनाचा व्यायाम करा, असेही आवाहन डॉ. जिभकाटे यांनी केले.