पुण्याचे योगेंद्र पुराणिक जपानमध्ये नगरसेवक

    दिनांक :24-Apr-2019
 
पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मूळ पुणेकर योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपानच्या महानगरपालिका निवडणूक रिंगणात उतरून विजयी झाले आहे. भारतातील हजारो लोक जपानमध्ये राहायला सुरवात झाल्यापासून या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहून विजयी होणारे योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय ठरले आहेत.
बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, जे भारतीय लोक जपानमध्ये राहतात त्यांच्या पेन्शनबाबतचा प्रश्न सोडवता यावा, यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचे योगेंद्र यांनी सांगितले.
 

 
 
योगेंद्र हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून निवडणूक लढले. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे. टोकियोमध्ये एकूण 23 महानगरपालिका आहेत. त्यातील एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढले आणि जिंकले. या मतदारसंघात साडेचार हजारपेक्षा जास्त भारतीयांचा पािंठबा त्यांना मिळाला. यासोबतच इतर स्थानिक जपानी नागरिकांचा पािंठबाही योगेंद्र यांना मिळाला होता. योगेंद्र 1997 साली शिक्षणसाठी जपानला गेले. त्यानंतर त्यांनी 2001 पासून आयटी क्षेत्रात 3 वर्षे, 10 वर्षे बँकिंग क्षेत्रात नोकरी करून आता जपानच्या राजकारणात उतरले आहेत.