झोप अपुरी झाल्यास कार्यक्षमतेवर परिणाम
   दिनांक :25-Apr-2019
वॉशिंग्टन,
झोपेची केवळ १६ मिनिटे कमी झाल्यास, तुमच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 'स्लीप हेल्थ' या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. झोपेचे वेळापत्रक बिघडल्यास तुमच्या कामावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे या संशोधनात म्हटले आहे. अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा'मधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यामध्ये त्यांनी १३० सुदृढ कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. हे सगळे कर्मचारी आयटी क्षेत्रातील होते, तसेच त्यांना किमान एक शाळेत जाणारे मूल होते.

 
 
ज्या कर्मचाऱ्यांनी नेहमीपेक्षा १६ मिनिटे कमी झोप घेतली, तसेच नेहमीसारखी गाढ, शांत झोप घेतली नाही अशा सगळ्यांना दुसऱ्या दिवशी काम करताना बऱ्याच समस्या उद्‌भवल्या. त्यांचा तणाव वाढला, घर आणि काम यांमधील संतुलन बिघडले, ते रात्री लवकर झोपले तसेच थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले.
'आपल्या कर्मचाऱ्यांची झोप पुरेशी होईल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, कंपन्यांसाठी आवश्यक आहे. चांगली झोप झाल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील, आपल्या कामावर एकाग्रतेने लक्ष देऊ शकतील, कामातील चुका कमी होतील तसेच सहकाऱ्यांसोबतचे वादही टळतील,' असे मत संशोधक सूमी ली यांनी मांडले.