मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी अब्दुल गनीचा मृत्यू
   दिनांक :25-Apr-2019
नागपूर,
मुंबईसह अख्ख्या देशाला हादरवून सोडणार्‍या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील एक आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (68) याचा आज गुरुवारी येथील मेडिकल कॉलेजमध्ये आजाराने मृत्यू झाला.
12 मार्च 1993 रोजी मुंबईच्या माहीम येथील मच्छीमार कॉलनी, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी बाजार, हॉटेल सी रॉक, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंचूर, वरळी आणि पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीसह एकूण 13 ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. दुपारी दीड वाजेपासून सुरू झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या घटना सायंकाळपर्यंत सुरूच होत्या. या घटनेमुळे अख्ख्या मुंबईसह संपूर्ण देशाला एकच हादरा बसला होता. हे बॉम्ब कार आणि स्कूटरमध्ये पेरण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात सुमारे 300 जण ठार झाले होते तर 1400 जण जखमी झाले होते. याच बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई पोलिसांनी अब्दुल गनीला अटक केली होती. मुंबईतील सेंच्युरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली त्याने दिली होती.

 
 
1912 मध्ये अब्दुल गनीला पुण्याच्या येरवडा कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. त्याच्यावर टाडाची कारवाई करण्यात आली होती. 1912 पासून अब्दुल गनी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता.
नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असताना एक वर्षांपूर्वी अब्दुल गनीला पक्षाघाताचा झटका बसला. त्यामुळे बरेच दिवस तो मेडिकलमध्ये भरती होता. त्यानंतर त्याला चालता येत नव्हते. परंतु, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे त्याला कारागृहातील दवाखान्यात भरती करण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी त्याला तपासणीसाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याला कारागृहातील दवाखान्यात भरती करण्यात आले.
 
गुरुवारी सकाळी 11.40 च्या सुमारास अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. लगेच त्याला मेडिकलला नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा मृत्यू झाल्याचे समजताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी ही माहिती उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांना दिली. देसाई यांनी पुणे आणि मुंबईच्या अधिकार्‍यांना ही माहिती दिली. धंतोली पोलिसांतर्फे गनीच्या मुलांना आणि इतर नातेवाईकांना सुद्धा त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्याचे नातेवाईक नागपूरला निघाल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. सध्या गनीचा मृतदेह मेडिकलच्या शवागारात ठेवण्यात आला असून, त्याठिकाणी कारागृह, धंतोली, अजनी पोलिस आणि विशेष शाखेतील पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी गनीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.
 
याकूब मेमनला फाशी
1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई पोलिसांनी याकूब मेमन यालाही पकडले होते. न्यायालयाने त्याला फाशी सुनावली होती. काही वर्षांपूर्वी नागपूर कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली होती हे विशेष.