प्रेम, संशय, संकोच!
   दिनांक :25-Apr-2019
वेगळी गोष्ट 
- नीता राऊत  
  
प्रेम म्हणजे काय? त्याची व्याख्या वा त्याचे भाव, त्याची सुंदरता, त्याची गांभीर्यता या सगळ्या गोष्टी लिहिण्यासारख्या वा वाचण्यासारख्या नाही उरल्यात, असं मला वाटते, कारण यावर आपण सगळेच शाळेच्या, महाविद्यालयाच्या सहित्याच्या विषयातून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून पाहत आलोच आहोत आणि जवळपास आपण सगळेच या प्रेमाच्या भावनेतून कधी ना कधी गेलोच आहोत आणि जातच राहू...
 
एकदा एका मित्राशी गप्पा मारताना तो सहजच बोलला, की इथे खरं प्रेम असते ते एका आईच्या आपल्या मुलांवर आणि ते फक्त आईचं मुलांवर, बाकी तर एक गरज, जीवनाची, कोणीतरी सोबत असण्याची असो ते तेवढ्यापुरतंच... पण मनात आलं, असे कितीतरी घर आहेत, जिथे नाती फक्त जोडली गेली आहेत म्हणून निभावणं चालू असतं. बाकी प्रेम, ओढ, आपलेपणा, कधीच नसतो.... मग ती स्त्री असो वा पुरुष हा त्रास दोघांही जाणवू शकतो... 

 
 
मी बर्‍याच महिलांना सदान्‌ कदा पतीच्या तक्रारी करतानाच पाहिले आहे, म्हणजे इथंपर्यंत की बसं आता त्यांना आपल्या पतीचा जीव घेणेच बाकी राहिले इतक्या त्या त्रासून गेल्या असाव्यात आणि मग पती घरी आला की सगळं विसरून जायचं. माझ्या मनात नेहमी यायचं की तुम्ही जर स्वताच्या पतीचा इतका तिरस्कार करता तर मग त्याच्यासोबत अमूल्य जीवन कसं काय वाटून घेता? नाही तर मग त्यांचा त्रास होतो तर तो त्यांच्याशीच बोलून सगळं निस्तारून का नाही घेत? उगीच लोकांच्या समोर त्याच प्रदर्शन का?
 
मुळात आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्याच विरोधात बाहेर कसं काय बोलू शकतो? नाहीतर मग माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे वाक्य तरी शब्दांपुरताच असते कदाचित... एखाद्यावर प्रेम करतो म्हणणे जितके सोपे आहे, तितकेच कठीण... त्याला त्याच्या गुण-दोषसकट स्वीकारणं आहे... प्रेमात पडायला एक क्षण लागते पण त्या व्यक्तीला समजून त्याच्या रंगात रंगायला त्याला आपल्या रंगात रंगवयला एक पूर्ण आयुष्य द्यावे लागते.
 
प्रेमाला ना तर वयाचं बंधन असतं आणि ना आपण किती जणावर, किती आपल्यावर प्रेम करतील याची मर्यादा असते. प्रेम जिद्द नाही तर एक सरल भावना आहे. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सदैव आनंदित ठेवण्याची. त्याला जपण्याची... मग तो आपल्याजवळ वास्तविक रूपात असो वा नसो. तो जिथे आहे तिथे आनंदी आहे यात स्वताच आनंद मानने... पुरणतल्या कथेत काही स्त्रिया आहेत. ज्यांची दखल द्यायला मला नक्कीच आवडेल... एक राधा आणि एक मीरा त्यानी फक्त प्रेम केलं. कुठल्याच गोष्टींची अपेक्षा न ठेवता... कोणताही संशय वा संकोच मनात न आणता श्रीकृष्णाबरोबर त्यांचं नाव अजरामर झालं...