राहुल गांधींनी स्वीकारला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा
   दिनांक :25-Apr-2019
अहमदनगर,
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.
 

 
राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळेच विखेंनी काँग्रेस अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आज तो स्वीकारल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आपण विखेंशी बोललो असून, काँग्रेसचे काम करण्यासाठी ते अनुकूल असल्याचे चव्हाण म्हणाले.
विखेंबरोबरच अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला असून पूर्ण जिल्हा समिती बरखास्त केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.