काँग्रेसच्या जिलाध्यक्षपदावरून सुभाष धोटे यांचा राजीनामा
   दिनांक :25-Apr-2019
-अत्याचार प्रकरणी निर्लज्ज वक्तव्य केल्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
 
 
 
चंद्रपूर, तभा ऑनलाईन 
राजुरा येथील अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या तक्रारींबाबत निर्लज्ज आणि बेेताल वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांच्याविरुध्द बुधवारी रामनगर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. हे अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर, आज गुरुवारी धोटे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो मंजूरही झाला.
 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हेच अध्यक्ष असलेल्या राजुरा येथील एका शाळेच्या वसतिगृहात गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन आदिवासी मुलींवर सातत्याने अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. तेव्हापासून हे प्रकरण गाजत असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वसतिगृहाच्या पाच आरोपींना अटक केली. ते आता पोलिस कोठडीत आहेत. शिवाय, या प्रकरणी दाद मागायला पीडितांचे पालक न्यायालयात गेले असता, चौकशीसाठी विशेष न्यायालयीन समिती गठित करण्यात आली. शासनाने नामांकित शाळेचा दर्जाही काढून घेतला. सिआयडी चौकशी लागली. या सार्‍या घडामोडींमुळे ज्या मुलींवर अत्याचार झाला, त्या व त्यांचे पालक पुढे येऊ लागले. तक्रारी वाढत असल्याने अस्वस्थ झालेल्या सुभाष धोटे यांनी, पत्रपरिषदेत आदिवासी मुली आणि त्यांच्या पालकांबाबत लांच्छणास्पद वक्तव्य केले.
 
पोक्सो कायद्यांतर्गत शासनाकडून मदत मिळते म्हणून आदिवासी मुली आणि त्यांचे पालक अत्याचाराच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हिरहिरीने पुढे सरसावत आहेत, असे ते वक्तव्य होते. या वक्तव्याच्या समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आदिवासी समाजाच्या लोकांनी विविध पोलिस ठाण्यांत या वक्तव्याविरुध्द तक्रारी केल्या. त्यामुळे सुभाष धोटे यांच्यावर बुधवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेच आज गुरुवारी सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो तातडीने मंजूरही झाला.
 
धोटे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतच होती. मात्र, ते राजीनामा देत नव्हते आणि पक्षश्रेष्ठीही त्यांची पाठराखण करीत होते. नैतिक जबाबदारी पाळून धोटे यांनी राजीनामा द्यावा, अश्या आशयाचे वार्तापत्र तभाने खुप आधी प्रकाशित केले होते. किंबहुना, या वक्तव्याचे गांभीर्य पाहून, आमदार विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागितली आणि सुभाष धोटे यांनीसुध्दा माफी मागावी आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, असे सूचवले होते. तशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही केली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरच धोटे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.