महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत
   दिनांक :25-Apr-2019
- वाशीम जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण 
 
 
 
वाशीम,
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे. त्यामुळे सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांकरिता 30 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12 वाजता वाशीम येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
 
जिल्हा परिषदेकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) आरक्षणाबाबत सोडत 27 ऑगस्ट 2018 रोजी काढण्यात आली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑगस्ट 2018 रोजी स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांतर आता 30 मार्च 2019 रोजीच्या पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे.
 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागराकांचा मागास प्रवर्गासाठी काढण्यात आलेले आरक्षण अबाधित ठेवून वाशीम जिल्हा परिषदेच्या केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 30 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. तरी जिल्हा परिषद क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी या सोडत सभेला उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
 
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसाठी यापूर्वी 27 ऑगस्ट 2018 रोजी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात बदल प्रस्तावित नसल्यामुळे या आरक्षण सोडतीची माहिती 30 एप्रिल 2019 रोजी त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयासाठी माहितीकरिता उपलब्ध राहील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची व प्रारूप प्रभाग रचनेची माहिती 2 मे 2019 रोजी अधिसूचने अन्वये प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.