पोहणे शिकताना तरुणाचा बुडून मृत्यू
   दिनांक :25-Apr-2019
नागपूर, 
पोहणे शिकत असताना एका तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मेडिकलमधील जिमखाना परिसरातील पोहण्याच्या टाक्यात घडली. नवीन छगनरान श्रीराव (रेणुका मातानगर) असे मृताचे नाव आहे.
 
 
शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय परिसरातील (मेडिकल) जिमखाना येथील जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी नवीनने वर्ग लावले होते. परंतु प्रशिक्षणाच्या नवव्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. पोहणे शिकत असताना बुधवारी सायंकाळी तो बुडू लागला. ही बाब लक्षात येताच येथील लाईफ सेव्हिंग गार्ड्सनी त्याला बाहेर काढले. प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
 
नवीन हा अभियांत्रिकीचा विद्याार्थी होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची कॅम्पस मुलाखतीत हैदराबाद येथील एका कंपनीत निवड झाली होती. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. ही घटना घडली तेव्हा जलतरण तलावावर पाच ते सहा प्रशिक्षक आणि पाच ते सहा लाईफ सेव्हिंग गार्डस होते. इतकी सुरक्षा असतानादेखील ही घटना कशी घडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.