राहुल गांधींचा खोटारडेपणा अन्‌ लबाडीही...
   दिनांक :25-Apr-2019
 कालपर्यंत ते बिनधास्तपणे ‘चौकीदार चोर हैं’च्या घोषणा जाहीरपणे देत होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत असल्या राजकीय घोषणा देणे म्हणजे गंमत वाटली त्यांना! तसेही खरे बोलायचे कुठे असते निवडणुकीच्या काळात? विलासराव देशमुख नव्हते का म्हणाले, निवडणुकीत थापा माराव्याच लागतात म्हणून! शेवटी पक्षनेतृत्वाने केलेल्या दिशादर्शनाचाच परिणाम तो. कालपर्यंत कॉंग्रेसचे कार्यकर्ते गंडवायचे लोकांना. खोटी आश्वासनं, भूलथापा, पूर्ण होऊ न शकणारी लोकप्रिय आश्वासनं, लोकहितापेक्षाही मतांवर परिणाम करू शकतील अशा योजना सरकारी तिजोरीतून राबविण्याचा डाव... या सार्‍या बाबी म्हणजे त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणाचा भाग असायच्या. आजही आहेत. गेले काही दिवस चौकीदार चोर असल्याच्या ज्या आरोळ्या कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी बेंबीच्या देठापासून ओरडत ठोकताहेत, त्याचे धड स्पष्टीकरणही त्यांना न्यायालयात देता आलेले नाही. ज्याला तुम्ही चोर चोर म्हणून हिणवताय, तो चौकीदार नेमका आहे कोण, या न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचेही नीट उत्तर राहुल गांधींना देता आले नाही. बरं, उलट्या बोंबा ठोकण्यात त्यांचा तरबेजपणा एवढा की ‘चौकीदार चोर हैं’च्या घोषणा देताना चूक झाल्याचे कबूल करून न्यायालयाबाहेर पडत नाही, तर पुन्हा त्याच घोषणांचा पाढा वाचणे सुरू झाले. न्यायालयात एक अन्‌ जनतेसमोर भलतेच, असा विरोधाभास सुरू झाला. पण, निर्लज्जपणाचा कळस असा की, मागितल्या गेलेल्या माफीचा न्यायालयाने अस्वीकार करून गांधींच्या दुटप्पीपणाचे बुरखे टराटरा फाडले, तरी स्वारी आपल्या त्याच तोर्‍यावर कायम आहे अद्याप...
 

 
 
 
पंतप्रधानांनी, आपण या देशाचे चौकीदार असल्याचे सांगितल्यानंतर, त्यांच्या भूमिकेतील साधेपणाचा बोध घ्यायचे सोडून, राफेल प्रकरणी त्यांना आरोपीच्या िंपजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. चौकीदारच चोर असल्याच्या घोषणा देत कांगावा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. बरं, सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचे धाडस करणार्‍यांची तोंडं तरी बघा एकदा. बोफोर्सपासून तर कोळशापर्यंत अन्‌ टुजी, थ्रीजीपासून कॉमनवेल्थपर्यंत एकाहून एक घोटाळा ज्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे, ते कॉंग्रेसचे नेते तोंड वर करून दुसर्‍यांना भ्रष्टाचारी ठरवायला निघाले आहे. जराशी तरी लाज कशी वाटत नाही यांना? गेल्या निवडणुकीत तोंडावर आपटी खाल्ली. धड विरोधीपक्षनेतेपद वाट्याला येईल इतके सदस्यही निवडून आले नाहीत कॉंग्रेसचे. वर्षानुवर्षे सत्तेत राहण्याची सवय जडलेल्या गांधी घराण्याला त्याचे शल्य आहे. बरं, परिस्थिती अशी की, पुढची अजून काही वर्षेतरी पुन्हा सत्ता हाती लागण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही. त्यामुळे अस्वस्थता एवढी वाढली आहे की, सत्ताप्राप्तीचा लढा सरळमार्गाने लढण्याचे भानही हरपत चालले आहे कॉंग्रेसजनांचे. खोटेनाटे धंदे करून निवडणूक जिंकण्याची सरळ, साधी, सोपी वाटणारी शक्कल शोधून काढली आहे त्या पक्षाच्या हुशार नेत्यांनी. एकदा का सरकारला चोर म्हटलं की संपलं सारं. मग बोफोर्स प्रकरणात काय घडलं होतं, हेही सांगण्याची गरज उरत नाही, आदर्श घोटाळ्यात महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना घरी का पाठवण्यात आलं, हेही सांगावं लागत नाही, की कोळसा घोटाळ्यात मलिदा कुणाच्या घशात गेला होता, हेही सांगण्याची जबाबदारी येत नाही कुणाच्याच अंगावर.
राफेल प्रकरणात सौदा कुणी केला होता, त्या सौद्यासाठीच्या चर्चेची सुरुवात कधी झाली होती, ती कुणाच्या काळात झाली होती, सुरुवात जर कॉंग्रेसच्याच सत्ताकाळात झाली होती, तर मग आता त्या व्यवहारात नेमके काय बदल झाले, ते देशासाठी हितकारक की हानिकारक, याबाबत जनतेला वास्तव सांगून जनजागृती करण्याचा अधिकार लोकशाहीव्यवस्थेने प्रदान केलेला असताना, त्या मार्गाचा अवलंब करायचे सोडून, लोकप्रबोधनाचा मार्ग स्वीकारायचे सोडून हुल्लडबाजी करून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न चालला आहे इथेतर. त्यावेळच्या विरोधकांनी कसा उघडकीस आणला होता कोळसा घोटाळा? वाटलेल्या खाणी परत घ्याव्या लागल्या सरकारला. टुजी-थ्रीजी प्रकरणात ए. राजाला जेलची हवा खावी लागली. कॉमनवेल्थ प्रकरणात कलमाडींना जेलमध्ये जावे लागले. कारण त्या पद्धतीने पावले उचलली होती विरोधकांनी. न्यायालयीन लढा लढण्याची तयारी केली. अभ्यास केला. पुरावे गोळा केले... लेकहो, लढा ना मग राफेलचाही लढा त्या मार्गाने. असतीलच कुणी गुन्हेगार त्या व्यवहारात तर जातील कारागृहात. पण, ते करायचे सोडून नुसताच होहल्ला करण्याचा मार्ग स्वीकारला आहे कॉंग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी. यांना कोर्टात लढणे नको, की जनतेच्या दरबारात खर्‍या मुद्यांची मांडणी नको. पुरावेबिरावे गेले खड्‌ड्यात. समोरची व्यक्ती चोर असल्याची ओरड करायची बस्स! काम फत्ते! आता आली का पंचाईत. न्यायालयात माफी मागण्याची वेळ आली ना!
बाहेर चौकीदार चोर असल्याची ओरड करणार्‍या, जाहीर सभांमध्ये लोकांना तसल्या घोषणा देण्यास सांगणार्‍या राहुल गांधींनी प्रत्यक्षात मात्र, असे करून आपण चूक केली असल्याचे सांगत त्याबाबत न्यायालयासमोर केवळ खेद व्यक्त केला. न्यायालयाने राफेल प्रकरणात जारी केलेल्या एका निकालासंदर्भात चुकीचा अर्थ काढून निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहाच्या ओघात आपण हे वक्तव्य केल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. झाल्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आणि न्यायालयाच्या बाहेर येत नाही तोच पुन्हा ‘चौकीदार चोर’ या नाटकाचा एकपात्री प्रयोग आरंभला. चौकीदार चोर असल्याची खात्री आहे ना? लोकांपुढे बिनधास्तपणे म्हणता ना तसे? मग न्यायालयात का पंढरी घाबरते तसे बोलायला? तिथे का नाही छातीठोकपणे सांगत चौकीदार चोर आहे म्हणून? कारण न्यायालयात जाहीर सभांसारखे बिनधास्त खोटे बोलता येत नाही. बिनबुडाचे आरोप करून मोकळे होता येत नाही. तिथे पुराव्यानिशी बोलावे लागते. तो काही राजकारणाचा आखाडा थोडीच आहे, मनात येईल ते बरळायला? मग तिथे फे फे झाली साहेबांची. जाहीर सभांमधून वाट्‌टेल ते बोलणारे गांधी न्यायालयात खेद व्यक्त करून मोकळे झाले. न्यायालयाच्याच निर्णयाचे स्वत:च्या मर्जीने, स्वत:च्या सोयीने, राजकीय हेतूने प्रेरित अर्थ काढून निवडणूक लढवायला निघालेल्या राहुल गांधींना, त्यांचा खेदमाना नाकारून, खुद्द न्यायालयाने थोबाडीत हाणली आहे. राहुल गांधी, जे जनतेत मोठ्‌ठ्याने बोलत सुटलेत, ते चूक असल्याचे न्यायालयात कबूल करताहेत, याचा अर्थ ते जनतेशी खोटे बोलत आहेत. भाबड्या नागरिकांची फसवणूक करीत आहेत. जे नाहीच त्या प्रकरणाचा बागुलबोवा उभा करून राजकारण करीत आहेत, हेच यातून स्पष्ट होते. शतकाहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष इतक्या बेमालूमपणे खोटारडेपणा करतो, याची तर त्या पक्षालाच लाज वाटायला हवी. त्यांना मनाची अन्‌ जनाचीही वाटत नसेल, तर मग मात्र या निर्लज्जांना धडा शिकवण्याची जबाबदारी सरतेशेवटी जनतेची आहे... कारण कालचे हे चोर आता खोटारडेपणा अन्‌ लबाडीही करू लागले आहेत....