लाच मागीतल्याप्रकरणी खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात
   दिनांक :25-Apr-2019
वाशीम,
गिट्टी व मुरुमावर ट्रॅक्टर वाहतूक सुरु ठेवण्यासाठी एका खाजगी इसमाने पोलिसांच्या नावाने १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 
 
अनसिंग पोलिस ठाण्यात कार्यरत जमादार पत्रे यांनी २५ जानेवारी २०१८ रोजी तक्रारदाराचा गिट्टीचा ट्रॅक्टर वाहतूक करतांना पकडून ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये गिरजाराव धोंडबाराव मस्के (वय ४८) रा. जयपूर ता. जि. वाशीम या खाजगी इसमाकडे देण्याचे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ जानेवारी रोजी पडताळणी केली असता खाजगी इसमाने तडजोडी अंती पोलिसाच्या नावाने 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ३ महिन्यानंतर लाचलुचपत विभागाने खाजगी इसम गिरीजाराव याला अटक करुन अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.