प्रदर्शनाआधी लीक झाला ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’
   दिनांक :25-Apr-2019
‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ हा बहुप्रतिक्षीत हॉलिवूड सुपरहिरोपट उद्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना एक धक्कादायक  बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे.
 
‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ या चित्रपटाची इंग्रजी भाषेतील पायरेटेड कॉपी तमिळरॉकर्स या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. चाहत्यांनी या वेबसाईटवरचे ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’चे अनेक स्क्रिनशॉट्स ट्विटरवर शेअर केले आहेत. तशीही भारतात तमिळरॉकर्स ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. या वेबसाईटने यापूर्वीही अनेक चित्रपट असेच लीक केले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’चे काही व्हिडीओ लीक झाले होते. आता तर तामिळ रॉकर्सच्या वेबसाईटवर अख्खा चित्रपट उपलब्ध आहे.

 
काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट लीक न करण्याची विनंती केली होती. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गत वर्षी मद्रास हायकोर्टाने ३७ इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला १२ हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यात तमिळरॉकर्स वेबसाईटच्या २ हजार मायक्रोसाइट्चादेखील समावेश होता. तामिळरॉकर्स वेबसाईट ब्लॉक केल्यानंतर तिच्याच हजारो मायक्रोसाइट्स सक्रिय झाल्या आणि यातून चित्रपट लीक व्हायला सुरूवात झाली. गतवर्षी ही वेबसाईट चालवणाऱ्या काही जणांना अटक करण्यात आली होती. पण तरीही त्यावरून चित्रपट लीक होणे थांबलेले नाही.
 
तूर्तास ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत. भारताही चित्रपटाची जबरदस्त क्रेज आहे. इतकी की, दर सेकंदाला १८ तिकीटाची बुकींग सुरू आहे. त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव यावर पडणार नाही असे ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे.