आयुष्यभर मैत्री जपणारी गोष्ट-पुस्तक!
   दिनांक :25-Apr-2019
 खास बात 
सर्वेश फडणवीस 
 
नुकताच 23 एप्रिल ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून सगळीकडे उत्साहाने साजरा झाला. पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. प्राजक्ताची फुले माळताना दोरासुद्धा रंगीत होतो, गंधित होतो, त्याचप्रमाणे चैतन्यमय अक्षरे वाचत राहिल्याने मन सजीव होते. प्रत्येक घरात देवघर असते, त्याप्रमाणे एक कोपरा तरी ग्रंथाने, पुस्तकाने भरला तर अनेक मने विचारांनी, ज्ञानांनी भरली जातील.
 
पुस्तकांचे योगदान अमूल्य असेच आहे. आपल्याला जन्मापासून नात्यांसोबतच ओळख होते ती अक्षरांची, शब्दांची. हे शब्द कायम आपल्यासोबत असतात ते अखेरच्या श्वासापर्यंत. आपण बोलतो त्या भाषेच्या रूपात तर ते असतातच, पण पुस्तकांच्या रूपात ते अगदी आपले जीवाभावाचे मित्र बनतात. इतिहासापासून ते विज्ञानापर्यंत आणि परिकथांपासून ते गणितापर्यंत अनेक गोष्टी पुस्तकेच आपल्याला शिकवतात. पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. 

 
 
आज इंटरनेट, मोबाईलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे, अशी सगळीकडे ओरड असताना आज सगळ्यात जास्त पुस्तके ही तरुण आणि युवा वाचतात, फक्त त्यांची आवड ही बदलली आहे. आज इंग्रजी पुस्तके वाचण्याचा ट्रेण्ड आहे आणि मराठी पुस्तके कमी प्रमाणात वाचली जातात हेही तितकेच खरे आहे. सोशल मीडियावर अनेक तरुण व्यक्त होताना अनेक पुस्तकांचा संदर्भ देत असतात. असे असताना युवावर्ग वाचतं नाही हे म्हणणे बरोबर ठरणार नाही. काळाप्रमाणे वाचनाची सवय बदलली. आज पुस्तके घेऊन कमी प्रमाणात वाचली जातात कारण किण्डलवर पुस्तके वाचण्याचा जमाना आला आहे. सध्या मोबाईलवर ही पुस्तकं वाचण्याचे अनेक अॅप उपलब्ध आहेत.
 
वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचे वाचन हे मोठ्यानेच करायला हवे. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की- त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेले मनात पेरले जाते आणि ते चांगले लक्षात राहाते म्हणून पुस्तके ही वाचायलाच हवी. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमे आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी. तरुणही आज वाचन समृद्ध करून व्यक्त होण्यासाठी प्रयत्नरत होत आहे. वाचनाच्या आवडीसाठी ही पुस्तकेच येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साह देतात. निवांत क्षणी माणसाचा एकटेपणा घालवण्याचा सगळ्यात चांगला सोबती म्हणजे ही पुस्तके. एकवेळ मित्र नसतील तर चालतीलं पण पुस्तकांशी केलेली मैत्री कायम उत्साह प्रदान करते म्हणून पुस्तके ही आयुष्यभर मैत्रीच्या रूपाने जपण्याची गोष्ट आहे.
 
1995 मध्ये युनेस्कोने हा दिन साजरा करायचा निर्णय घेतला. त्यानंतर जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून हा दिन साजरा होतो आणि सलाम केला जातो आपल्या खर्‍या आणि अखेरच्या श्वासापर्यंत सच्ची सोबत देणार्‍या या मित्रांना अर्थात पुस्तकांना! चला वाचनाची सवय अधिक वृिंद्धगत करत नवनवीन पुस्तकांची सोबत करत आयुष्य अधिक समृद्ध करूया.
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!