'या' कंपनीला होणार 5 बिलियन डॉलर्सचा दंड
   दिनांक :25-Apr-2019
फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ६० कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर सातत्याने डेटा लीक होत असल्याच्या अनेक घटना समोर येत असल्याने फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेसबुकला तब्बल 5 बिलियन डॉलर्सचा दंड होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून फेसबुक युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि याच कारणामुळे फेसबुकला अब्जावधींचा दंड होण्याची शक्यता आहे.
 
 
फेसबुक युजर्सची सुरक्षितता धोक्यात आल्याप्रकरणी सध्या फेसबुकची चौकशी सुरू आहे. फेडरल ट्रेंड कमिशन (FTC) याच अनुषंगाने 5 बिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्याची शक्यता असल्याचा अंदाज फेसबुकने व्यक्त केला आहे. फेसबुककडून एवढा मोठा दंड वसूल झाल्यास तो कंपनीच्या एका महिन्यांच्या उत्पन्ना एवढा असेल. परंतु अद्याप एफटीसीकडून याबाबत कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, केब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा स्कँडलनंतर फेसबुकची चौकशी सुरू असून या प्रकरणी कंपनीने एफटीसीसोबत सेटलमेंट करण्यासाठी 3 बिलियन डॉलर्स वेगळे ठेवले होते. 2011 मध्ये फेसबुकने एफटीसीसोबत एक करार केला होता आणि त्या करारानुसार युजर्सच्या परवानगीशिवाय त्याची माहिती शेअर करणार नाही असे सांगितले होते. परंतु फेसबुकने या कराराचे उल्लंघन केल्याने सध्या चौकशी सुरू आहे. फेसबुकचे सीईओ डेव्ह वेनर यांच्या मते, या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर दंडाची रक्कम किती असेल हे सांगता येत नाही.