पाचपैकी चार बॉम्बने घेतला अचूक वेध
   दिनांक :25-Apr-2019
- बालाकोट हल्ल्याची सत्य माहिती
नवी दिल्ली,
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर केलेला हवाई हल्ला अतिशय परिणामकारक असल्याची सत्यता समोर आली आहे. भारतीय हवाई दल बालाकोट हल्ल्यात इस्रायलनिर्मित सहा स्पाईस 2000 या बॉम्बचा वापर करणार होती. यातील पाच बॉम्ब बालाकोटवर टाकण्यात आले. चार बॉम्ब अचूक निशाण्यावर जाऊन पडले, तर एक बॉम्ब जंगलात पडला, असा दावा हवाई दलाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
 
 
 
11 ते 13 एप्रिल या काळात दिल्लीत ही बैठक झाली. या बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या बालाकोट येथील हल्ल्यात आमचे काहीच नुकसान झाले नाही, असा दावा करणार्‍या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन्‌ या देखील उपस्थित होती.
 
या हवाई हल्ल्यात 6 स्पाईस 2000 बॉम्ब टाकण्यात येणार होते, पण तांत्रिक अडचणींमुळे सहावा बॉम्ब फेकता आला नसल्याची माहिती सूत्राने दिली. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला होता. यात 40 जवान शहीद झाले होते.