हृतिकला मिळालं आंतरराष्ट्रीय पुस्तकात स्थान
   दिनांक :25-Apr-2019
लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनने २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर केवळ भारतीय तरुणीच नाही तर विदेशी प्रेक्षकही घायाळ आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता पार सातासमुद्रापार पोहोचली आहे. मात्र एक सशक्त अभिनेता होण्यासाठी हृतिकने बराच संघर्ष केला असून अनेक वेळा त्याने त्याच्या संघर्षाबाबत खुलेपणाने चर्चा केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघर्षाची दखल एका आंतरराष्ट्रीय पुस्तकाने घेतली आहे.

 
 
आंतरराष्ट्रीय आणि प्रसिद्ध असलेल्या बेन ब्रूक्स या पुस्तकामध्ये हृतिकने स्थान मिळविलं आहे. ‘Stories for boys who dare to be different’ या पुस्तकात बीथोवेन, बराक ओबामा, फ्रॅंक ओसन यांसारख्या महान व्यक्तींसह ऋतिकच्या संघर्षांला चित्रित करण्यात आले आहे. नुकतंच हृतिकने सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली. “मला पुन्हा त्या जुन्या आठवणीत रममाण व्हायचं आहे आणि ११ वर्षाच्या त्या ऋतिकला आज हा दिवस दाखवण्याची इच्छा असल्याचं’ ऋतिकने इंन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पुस्तकासाठी त्याने धन्यवादही दिले आहेत”.
 
 
 
लहान असताना हृतिकने ज्या समस्यांचा सामना केला. त्या साऱ्या समस्यांवर या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे. लहानपणी बोलताना अडखळत बोलण्याच्या समस्येमुळे इतरांशी बोलताना त्याला कशाप्रकारे संकोच वाटायचा, स्कोलियोसिससह (स्पाइनल कॉर्डसंबंधी स्थिती) आयुष्य जगणे तसेच प्रत्येक परिस्थितीत कठोरता आणि दृढ संकल्प करत या सर्व समस्यांना मागे टाकत कशाप्रकारे त्याने पुढे जात यश मिळवले याबाबतची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली असून ऋतिकला एक प्रेरणा म्हणून सर्वांसमोर आणणे हाच या पुस्तकाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हृतिक सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ मध्ये व्यस्त आहे. एका गणितज्ञाच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३० विद्यार्थांना आयआयटी आणि जेइइच्या परिक्षांसाठी कशाप्रकारे तयार केलं जातं ते या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. विकास बहल दिग्दर्शित ‘सुपर 30’ हा चित्रपट प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.