विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : मनू, हीना अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

    दिनांक :25-Apr-2019
बीजिंग,
 मनू भाकर आणि हीना सिधू या दोघींना आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आहे.
 
पात्रता फेरीत मनूने ५७५ आणि हीनाने ५७२ गुण मिळवले असून त्यांना अनुक्रमे १७व्या आणि २६व्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाच्या किम मिनजुंगला सुवर्णपदक मिळाले. तिने अंतिम फेरीत २४५ गुणांची कमाई केली.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पात्रता फेरीत चैन सिंगला ११६५ गुण मिळाल्यामुळे २७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पारूल कुमारला ११६४ गुणांसह ३३वा क्रमांक मिळाला. याचप्रमाणे ११४५ गुण मिळवणाऱ्या संजीव कुमारला ५८वे स्थान मिळाले. चेक प्रजासत्ताकच्या फिलिप नेपेजचलला सुवर्ण व रशियाच्या सर्जी कामेनस्कीला रौप्यपदक मिळाले.
 
महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्वनी सिंगला १०वे स्थान मिळाले, हीच भारताची दिवसातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिने ५७७ गुण मिळवले, तर अंतिम फेरीसाठी पात्र खेळाडूला ५७८ गुण मिळाले.