पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ
   दिनांक :25-Apr-2019
नवी दिल्ली ,
 देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या काही काळापासून दोन-तीन दिवसांच्या फरकाने पैशांमध्ये वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात ७ पैसे तर डिझेलच्या दरामध्ये ९ पैशांनी वाढ झाली.
 
 
या दरवाढीमुळे मुंबईतील पेट्रोलचा दर ७८.५९ प्रति लीटर आणि डिझेलचा दर ६९.६५ रुपयांवर पोहोचला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने दर नियंत्रणात असले तरीही अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीवर निर्बंध आणल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.
मागील १० दिवसांमध्ये डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ नोंदविली गेली. तर पेट्रोलमध्ये ५-७ पैशांचा चढउतार पहायला मिळाला. १ एप्रिलला पेट्रोलची किंमत ७८.४३ पैसे होती, तर डिझेलची किंमत ६९.१७ पैसे होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. भारत गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. गुरुवारी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मुल्य ७०.०४ रुपये होते. बुधवारपेक्षा १६ पैशांनी रुपया घसरला. तसेच अमेरिकेने ओपेक देश आणि इराणवर निर्बंध लादल्याने आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली. आशियाई बाजारात ब्रेंट क्रूडच्या बॅरलची किंमत ७४.५३ डॉलर होती.