श्रीलंकेत ड्रोन्स, मानवरहित विमानांवर बंदी
   दिनांक :25-Apr-2019
- अतिरेक्यांची धरपकड सुरूच, आणखी 16 जणांना अटक
- स्फोट मालिकेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचा आकडा 11
कोलंबो,
कोलंबो आणि अन्य दोन शहरांमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर सावधतेचे उपाय म्हणून श्रीलंकन सरकारने देशाच्या आकाशात ड्रोन्स आणि मानवरहित विमानांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. या स्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारल्यानंतर देशभरातच अतिरेक्यांविरोधात शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून, आज आणखी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यात ठार झालेल्या भारतीयांची संख्या आता 11 च्या घरात गेली आहे.
 

 
 
देशाच्या आकाशात ड्रोन्स आणि मानवरहित विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम राहील, अशी माहिती नागरी उड्डयन प्राधिकरणाने दिली आहे. याबाबतचा सरकारी आदेश आज जारी करण्यात आला. श्रीलंकेत एकापाठोपाठ नऊ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटमालिकेच्या कटात सहभागी असलेल्या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी देशभरात धाडी टाकण्यात येत असून, यात लष्कराच्या अनेक तुकड्या सहभागी आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 75 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या सर्व स्फोटांमध्ये नऊ मानवी बॉम्ब सहभागी होते, असे सूत्राने सांगितले.
आणखी एका भारतीयाचा मृत्यू
दरम्यान, एका चर्चमधील स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका भारतीयाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे यात ठार झालेल्या भारतीयांची संख्या आता 11 च्या घरात गेली आहे. एकूण 36 विदेशी नागरिक या स्फोटमालिकेत ठार झाले आहेत. यात बांगलादेशातील एक, चीनमधील दोन, भारतातील 11, डेन्मार्कमधील 3, जपान, नेदरलॅण्ड व पोर्तुगालमधील प्रत्येकी एक, सौदी अरबमधील 2, स्पेनमधील एक, तुर्कीतील 2, ब्रिटनमधील 6, अमेरिकेतील 2 आणि ऑस्ट्रेलियातील दोन नागरिकांचा समावेश आहे.