रॉयल्सला नमवून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी कोलकाताचे खेळाडू उत्सुक

    दिनांक :25-Apr-2019
कोलकाता,
 सलग पाच सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट गुणतालिकेत तळाच्या तीन संघांमध्ये असलेला कोलकाता नाइट रायडर्स संघ कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे गुरुवारी राजस्थान रॉयल्सला नमवून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी कोलकाताचे खेळाडू उत्सुक आहेत.
कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताची मदार प्रामुख्याने अष्टपैलू आंद्रे रसेल आणि नितीश राणा या धडाकेबाज फलंदाजांवर आहे. युवा शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांना आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकासाठी ऋषभ पंतच्या ऐवजी भारताच्या संघात स्थान मिळालेल्या कार्तिकने १० सामन्यांतून १६.७१च्या सरासरीने फक्त ११७ धावा केल्या आहेत. फिरकीपटू कुलदीप यादव, सुनील नरिन व पीयूष चावला यांचे अपयश कोलकातासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाजाचा अभावही जाणवत असल्याने रसेलच्याच अष्टपैलू कामगिरीवर या संघाची भिस्त आहे.
 
 
 
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसला आहे. मात्र बेन स्टोक्सचे अपयश संघाला महागात पडत आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर व फिरकीटू श्रेयस गोपाळ सुरेख कामगिरी करत असले तरी जयदेव उनाडकट व धवल कुलकर्णी यांच्याकडून त्यांना योग्य साथ लाभत नाही. १० सामन्यांतून तीन विजय मिळवलेल्या राजस्थानला उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असून क्षेत्ररक्षणातही त्यांना कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.
कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गर्नी, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, मॅट केली.
* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १