द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा रशिया-उत्तर कोरियाचा निर्धार
   दिनांक :25-Apr-2019
- पुतिन, किम जोंग उन यांच्यात चर्चा
व्लादिव्हस्तोक,
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्यात आज गुरुवारी प्रथमच द्विपक्षीय चर्चा झाली. उभय देशांमधील मैत्रीसंबंध आणि सहकार्य अधिकाधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी या बैठकीत भर दिला.
 

 
 
या ऐतिहासिक बैठकीकरिता किम जोंग बुधवारी सायंकाळीच रशियात दाखल झाले होते. रशियाच्या पूर्वेकडील दुर्गम अशा व्लादिव्हस्तोक या शहराची चर्चेसाठी निवड करण्यात आली. अमेरिकेसोबत अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावात किम जोंग यांनी रशियाचे सहकार्य मागितले आणि रशियानेही द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची हमी त्यांना दिली.
  
या बैठकीनंतर पुतिन आणि किम जोंग यांनी संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अतिशय जुने आहेत आणि ते मजबूत करण्याचा निर्धार आम्ही या बैठकीत व्यक्त केला आहे, असे यात नमूद आहे. आमच्यातील ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त राहिली. अनेक मुद्यांवर आमच्यात चर्चा झाली, असे किम जोंग यांनी यात म्हटले आहे, तर तुमच्या या ऐतिहासिक भेटीमुळे आपल्यातील मैत्री आणखी घट्ट होईल आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला.