बिनघोर झोपा...
   दिनांक :25-Apr-2019
‘तो बिनघोर झोपला होता’ असा एक वाक्‌प्रचार आहे. म्हणजे चोर चोरी करत असताना हा मात्र बिनघोर झोपला होता, असे म्हणतात. यात बिनघोर म्हणजे अत्यंत शांत आणि खोलवर झोप आली होती, असा आहे. याचाच अर्थ जे झोपेत घोरतात ती झोप स्वस्थ नसते. बरे बहुतेक माणसे झोपेत घोरतात अन्‌ त्यांना ते मान्य नसते. त्यांच्या घोरण्याने आजूबाजूच्यांना त्रास होतो अन्‌ मग त्यांना हटकले की ते म्हणतात, ‘‘हट्‌! मी कुठे घोरत होतो?’’
 
घोरणे या प्रकारावर विनोद करण्यात येतात, मात्र हा विषय गांभिर्याने घ्यायला हवा. घोरणे हे अनेक व्याधींचा अलार्म आहे. म्हणजे झोपेत तुम्हाला श्वसनाचा त्रास होतो आहे. त्याची शारीरिक कारणे खूप असू शकतात. निद्राश्वसनरोध म्हणजेच ‘स्लीप ॲनिया’ हा काही हसण्यावरी नेण्याचा प्रकार नक्कीच नाही. झोपण्यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकार, श्वसनरोध, पक्षाघात अशा अनेक व्याधी येऊ शकतात. 
 
 
अनेकदा गाढ झोपेतील व्यक्तीचे घोरणे त्यांच्या श्वसनमार्गावर ताण निर्माण करणारे असते. त्यामुळे, शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि हृदयावर त्याचा ताण पडतो. अनेकदा, त्यामुळे दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या येतात.
 
लक्षणे
  • यात घोरण्यामुळे श्वास रोखला जातो.
  • दचकून जाग येते, पुन्हा वेगात श्वास सुरू होतो, या क्रियेत श्वसनमार्गावर भार येतो.
  • झोप झाल्यावरही शांत वाटत नाही. चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी सुरू होते.
  • अर्थातच त्यामुळे एकाग्रता कमी होते. सतत मूडस्‌ बदलतात. उदास, चिडचिडे व कंटाळवाणे वाटते.
  • झोपेतून वारंवार लघवीसाठी जाण्याची इच्छा होणे आणि त्यामुळे स्वस्थ झोप लागत नाही.
  • जागे झाल्यानंतर घशास कोरड पडते. लहान मुलांना हा त्रास होतो तेव्हा ती बिछान्यात लघवी करतात.
  • झोपेत खूप घाम येणे, सतत वाईट स्वप्ने पडणे...
अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या. आता निद्रातज्ज्ञही आहेत. त्यांचा सल्ला घ्या.
 
अनियंत्रित वाढलेले वजन, आनुवांशिकता, आजच्या गतिमान आयुष्याची धावपळ, ताणतणाव, शारीरिक व्याधी, मानसिक अस्वस्थ्य, काळजी, असुरक्षिततेची भावना, अनियमित आयुष्य, चुकीचा आहार, पुरेसा व्यायाम नसणे... या सार्‍या प्रकाराने घोरण्याचा त्रास सुरू होतो. वय वाढत जाते तसा हा त्रास जास्त होतो. पुरुषांना हा त्रास जास्त होतो, कारण ते व्यसनांच्या आहारी गेलेले असतात.
 
केंद्रीय श्वसनरोध - घोरण्याच्या तक्रारीमध्ये एक टक्के रुग्णांमध्ये हा प्रकार असतो. यात श्वसनाचा प्रयत्नच केला जात नाही. मानवी मेंदू श्वसनाची क्रिया करण्याचा आदेश देण्यास जणू विसरतो. श्वसनक्रिया केंद्रीय मज्जासंस्थेच्या अधीन असल्याने या प्रकाराला केंद्रीय श्वसनरोध म्हणतात.
 
मिश्र श्वसनरोध- वरील दोन्ही प्रकारचा त्रास रुग्णास होत असल्यास त्यास मिश्र श्वसनरोध म्हणतात. यात श्वसनप्रवाहात अडसर येतो. डॉक्टरकडे गेल्यावर ते नेमका काय त्रास आहे त्यावरून उपचार ठरवितात.