जपानच्या निवडणुकीत पुणेकर 'योगी'ची बाजी
   दिनांक :25-Apr-2019
पुणे,
जपानमधील निवडणुकीत एका पुणेकराने आपला झेंडा रोवला आहे. मराठी जनांसाठी अभिमानाचा विषय ठरलेला हा पुणेकर म्हणजे योगेंद्र पुराणिक (योगी) आहे.
 
 
मूळचे पुण्याचे आणि आता जपानमध्ये स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक (वय ४१) टोकियोतील एडोगावा येथील महापलिका निवडणुकीत सुमारे ६ हजार ४७७ मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी २१ एप्रिलला मतदान झाले होते. मंगळवारी (२३ एप्रिल) निवडणुकीचा निकाल लागला. 'कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ जपान' या पक्षातर्फे पुराणिक यांनी निवडणूक लढविली. हा पक्ष जपानमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशाप्रकारे जपानमध्ये विजयी पताका फडकावणारे पुराणिक पहिलेच भारतीय ठरले आहेत. विशेष म्हणजे, जपानमध्ये सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवारांमध्ये ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
'योगी' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या पुराणिक यांनी 'जपानी आणि परदेशी नागरिकांमधील सेतू होण्याची माझी इच्छा आहे,' अशी भावना विजयानंतर बोलून दाखवली. आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण आदी मुद्यांचा समावेश केला आहे. टोकियोतील २३ मतदारसंघांमध्ये एडोगावामध्ये ४ हजार ३०० भारतीय मतदार आहेत. जपानमधील भारतीयांची संख्या पाहता, जवळपास १० टक्के भारतीय जनता एडोगावा येथे वास्तव्यास आहे. या मतदारसंघात कोरियन आणि चिनी नागरिकांचीही संख्या मोठी आहे.
पुराणिक यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना 'जपानमधील भारतीयांच्या योगदानाचे महत्त्व जपानी नागरिकांना समजल्याची ही खूण आहे,' असे मत 'चेंजिंग डायनॅमिक्स ऑफ इंडिया-जपान रिलेशन्स' या पुस्तकाचे लेखक शमशाद खान यांनी म्हटले आहे.