टाटा स्टील प्रकल्पात तीन स्फोट
   दिनांक :26-Apr-2019
लंडन,
ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट वेल्समधील टाटा स्टीलच्या प्रकल्पात किमान तीन स्फोट झाले आहेत. यूकेतील प्रसारमाध्यमांनी यासंबंधी वृत्त दिले आहे. स्फोटांनंतर प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
टाटा स्टील प्रकल्पातील स्फोटाच्या घटनेची माहिती मिळाली आहे, असं ट्विट साउथ वेल्स पोलिसांनी केले आहे. या प्रकल्पात ४००० हून अधिक कर्मचारी काम करतात. स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रकल्पात स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्फोटांमुळे घरे हादरल्याची माहिती काही स्थानिकांनी ट्विटद्वारे दिली. आगीचे लोळ दूरपर्यंत पसरले होते. स्फोटांच्या आवाजाने लोक सैरावैरा पळू लागल्याचेही स्थानिकांनी सांगितले.