राज्यात शेवटच्या टप्प्यात ३ कोटी १२ लाख मतदार करणार मतदान

    दिनांक :26-Apr-2019
 
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
 
 
 
या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून, 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 इव्हीएम, तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणार्‍या मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणार्‍या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत. नंदुरबार (अ. ज.), धुळे, दिंडोरी (अ. ज.), नाशिक, पालघर (अ. ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.