भारतीय बँकांत तब्बल 70 हजार कोटी रुपये बेवारस

    दिनांक :26-Apr-2019
 
 मुंबई: भारतीय बँक, पोस्ट, शेअर्स, इंश्युरन्समध्ये तब्बल ७० हजार कोटी रुपये बेवारस पडून असल्याची बाब उघड झाली आहे. सदर रकमेचे मालक एक तर जिवंत वा ही गुंतवणूक करून विसरून गेले असल्याची बाब नाकारता येत नाही, असे सूत्राने सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणातील नागरिक बँक, म्युच्युअल फंड, इंश्युरन्समध्ये गुंतवणूक करत असतात. अनेकदा लोक आपण कुठे गुंतवणूक केली आहे, हे विसरून जातात. मृत्यूनंतर वा वारसाला त्याबाबत काही माहिती नसल्याने असे प्रकार घडून आले आहेत. अशा मालकांची रक्कम बेवारस पडून असते.
 

 
 
भारतीयांनी फक्त पीअरलेस जनरल फायनान्स ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली १५०४ कोटींची रक्कम बेवारस पडून आहे. शेअर्समध्ये गुंतवलेले २५ हजार कोटी रुपये बेवारस पडले आहे. यातील मागील सात वर्षांतील चार हजार कोटींचे शेअर्स आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आले आहेत. याशिवाय बँकांमध्ये एकूण २० हजार कोटी रुपये बेवारस पडले आहेत. ज्या बँक खात्यांवर १० वर्षे कुणीही दावा करत नाहीत, ती बँकांच्या मालकीची होतात. जून २०१८ मधील आकडेवारीनुसार बँकांमधील अशा खात्यांमध्ये १९ हजार ५६८ कोटी रुपये होते. तसेच, भारतीय डाक खात्यांमध्ये एकूण ९ हजार ३९५ कोटी रुपये बेवारस पडले असून, ही खाती मॅच्युअर झाली असून कुणीही त्यावर दावा केलेला नाही.