कॉंग्रेस 100 पर्यंत पोचणार काय?
   दिनांक :26-Apr-2019
लोकसभा निवडणुकीच्या ती टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर राजकीय निरीक्षक आणि वाहिन्यांनी आपापले अंदाज वर्तविले आहेत. या तीन टप्प्यात भाजपाला मोठ्या संख्येत जागा मिळणार असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. पण, कॉंग्रेसला किती जागा मिळणार, हा पक्ष शंभरापर्यंत तरी मजल मारेल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
 
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, एकेकाळी केंद्रात आणि बहुतेक राज्यांमध्ये सत्तेत असलेली कॉंग्रेस आता आपली पत वाचविण्यासाठी प्रादेशिक पक्षांसोबत युती करताना दिसत आहे. दुसरीकडे रालोआमधून काही सहकारी सोडून गेले असतानाच, भाजपाने नवे सहकारी शोधले आहेत व त्यांची संख्या कॉंग्रेसपेक्षा कितीतरी अधिक आहे. भाजपाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच चालला असून, कॉंग्रेसचा ग्राफ मात्र वाढण्याची फारशी चिन्हे नाहीत, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ताजे विधान असे आहे की, कॉंग्रेसला बहुमत मिळणार नाही. पण, संपुआचे सरकार बनेल. ज्येष्ठतम नेते शरद पवार यांचे म्हणणे आहे की, कॉंग्रेसला शंभरपेक्षा काही जागा अधिक मिळतील. पण, बहुमत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.
 
 
 
भाजपाने अन्य राजकीय पक्षांची स्थिती, कॉंग्रेसने त्यांच्यासोबत केलेली युती पाहून आपली व्यूहरचना आखली आहे. या चालीत भाजपा पुढे असल्याचे सध्या दिसत आहे. उत्तरप्रदेशात सपा-बसपा युती झाल्यानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत मायावती आणि अखिलेश यांनी जाहीर केले होते की, कॉंग्रेसला युतीत जागा नाही. त्याचवेळी भाजपाने आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. कॉंग्रेस एकाकी पडली आहे हे पाहून राहुल गांधी यांनी प्रियांकाला आणले खरे, पण त्या पक्षाजवळ उत्तरप्रदेशात कॅडर नाही, ही त्यांची फार मोठी कमतरता आहे. त्या तुलनेत भाजपाजवळ कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. ते केवळ उत्तरप्रदेशात नाही तर अगदी पूर्वोत्तर राज्यांमध्येही आहे, ही बाब नजरेआड करून चालणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सपा-बसपा युती झाल्यानंतर वाहिन्यांनी केवढा मोठा गहजब केला होता. जणू भाजपाला उत्तरप्रदेशात एकही जागा मिळणार नाही, असेच बोलले जात होते. पण, आता सर्वांचीच नशा उतरली आहे. आता वाहिन्या भाजपा 40 ते 50 जागा जिंकणार असे सांगत आहेत. तर काही वाहिन्यांनी कॉंग्रेस मैदानात उतरल्याने भाजपाला तिहेरी लढतीचा लाभ मिळून 60-65 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये जेव्हा ममतांनी कॉंग्रेससोबत युती करण्यास नकार दिला, तेव्हाच भाजपाने आपल्या व्यूहरचनेला आकार दिला. भाजपाला या निवडणुकीत त्याचा मोठा फायदा मिळेल, असे दिसत आहे. कारण, येथे तृणमूल, कॉंग्रेस आणि माकपासोबत भाजपाची लढाई आहे. या चौरंगी लढतीचा भाजपा पुरेपूर फायदा उचलत आहे आणि प्रामुख्याने मोदी आणि अमित शाह यांनी तेथील वातावरणच बदलून टाकले आहे, असे पश्चिम बंगालच्या ज्येष्ठ पत्रकारांचे मत आहे.
 
कॉंग्रेसने ज्या राज्यांत युती केली आहे, त्यात बिहारमध्ये राजदने 40 पैकी 9 जागा दिल्या आहेत. तेथे अनेक मतदारसंघात नावापुरतीच युती आहे. कारण, अनेक ठिकाणी एकदुसर्‍याच्या विरोधात उमेदवार उभे केले गेले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत युती करून 26 जागा मिळविल्या आहेत. पण, येथे कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत फरफटत गेल्याचा निरीक्षकांचा अंदाज आहे. कर्नाटकात 28 पैकी 20, झारखंडमध्ये 14 पैकी सात, तामिळनाडूत द्रमुकसोबत युती करून 40 पैकी 9 आणि जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत चार जागांवर कॉंग्रेस लढणार आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडी असल्याने तेथे तिकीट वाटपासंबंधी वाद नाही. गेल्या निवडणुकीत युडीएफला येथे 12 जागा मिळाल्या होत्या. आठ जागा एलडीएफने जिंकल्या होत्या. पण, केरळमध्ये यावेळी भाजपाने जबरदस्त मुसंडी मारली आहे.
 
कॉंग्रेसला असे वाटते की, निवडणूक निकालानंतर जर रालोआला बहुमत मिळाले नाही, तर संपुआत आणखी पक्ष येतील. पण, त्याची शक्यता दूरदूरपर्यंत नाही, असे जाणकारांचे मत आहे. कारण, भाजपाजवळ स्वत:चीच 12 राज्ये आहेत, जेेथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. यापैकी 9 मोठी राज्ये आहेत. शिवाय रालोआसोबत युती असलेलीही अनेक राज्ये आहेत. कॉंग्रेसजवळ सध्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि पुडुचेरी ही पाच राज्ये आहेत. या पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये कॉंग्रेसला चांगले यश मिळेल. पण, अन्य राज्यांमध्ये तेवढे यश मिळण्याची सुतराम शक्यता नाही.
 
दोन टप्प्यांआधी विश्लेषकांचे असे मत होते की, भाजपा 220-230 पर्यंत मजल मारेल. पण, आता तिसर्‍या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर भाजपा बहुमताच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही वाहिन्यांनी तर भाजपाला पुन्हा 2014 सारखेच पूर्ण बहुमत मिळेल, असे भाकीत केले आहे.
निवडणुकीचे आणखी चार टप्पे बाकी आहेत. सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वांनाच उत्कंठा आहे, 23 मे रोजी लागणार्‍या निकालांची.