साहसी शिक्षण
   दिनांक :26-Apr-2019
पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा दर्‍या-डोंगरांनी व्यापलेला. शहरांच्या जवळ असूनही प्रगतीपासून कित्येक दूर असणारे आदिवासी बांधव आजही या भागात राहतात. शिक्षणाचे महत्त्व आजूनही इथल्या लोकांना पटलेले नाही. पंधरा-वीस वर्षांपूर्वी तर अधिकच वाईट परिस्थिती होती. मुले जमतेम आठवी-दहावीपर्यंत तरी शिकत असत. मात्र मुलींना तर चौथी-पाचवीच्या आधीच शाळेतून काढले जायचे. याच दरम्यान माळेगाव खुर्द येथील आश्रमशाळेत प्रमिला मनोहर भालके यांची नियुक्ती झाली. या विभागातील मुलींसाठी जणू शिक्षणाची पहाट उजाडली.

 
माळेगाव येथील शाळेत त्या शिक्षिका म्हणून आल्या तेव्हा त्या भागात मुली अजिबातच शिकत नव्हत्या. 4 थी पास. मुलगी औषधालाही सापडणे मुश्कील होते. या आदिवासी मुलींना शिक्षित करायचे, त्यांना समाजाच्या प्रवाहात आणायचे त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी ठेवून त्यांनी पालकभेटी सुरू केल्या. दिवसभर पालक शेतात नाहीतर कामधंद्याच्या निमित्ताने जंगलात िंकवा बाहेर गेलेले असायचे. त्यामुळे दिवसभरात पालकांची भेट होत नसायची. मग संध्याकाळी, रात्री भालके मॅडम मििंटग घ्यायच्या आणि नंतर तिथेच भजनालाही बसायच्या. एका शहरात शिकलेली स्त्री आपल्या समाजाने शिकावे विशेषत: मुलींनी शिकावे, यासाठी शिक्षणाचे महत्त्व सांगतेय. प्रगतीविषयी बोलतेय याचे पालकांना, ग्रामस्थांना, महिलांना खूप अप्रुप वाटायचे. कारण या भागात मुलगी एकदा वयात आली की लगेचच तिचे लग्न करून दिले जायचे. न शिकलेल्या मुली पुन्हा डोंगर-दर्‍यात शेतातच राहायच्या. दिवसभर लाकूडफाटा, जळण, गाईगुरे, कपडे, भांडी घरातली कामे करण्यातच वेळ जायचा. या मुलींनीही या ताईसारखे शिकावे असे पालकांना वाटू लागले आणि विशेषत: महिला पालकांनी मुलींना शाळेत पाठवायचेच असा निर्धार करून मुलींना शाळेत पाठवले आणि मुलीचे शिक्षण सुरू झाले. हळूहळू मुली 4 थी, 7 वी, 10 वी पास होऊ लागल्या आणि पालकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळा ही फक्त विद्यार्थी केंद्रित न राहता, एकूणच आदिवासी समाज उन्नतीचे केंद्र ही संकल्पना पुढे येऊन आदिवासी समाजासाठी असणार्‍या विविध कल्याणकारी योजना मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न सुरू झाले आणि या प्रयत्नांनाही यश आले.
 
शाळेत विविध प्रकारचे परदेशी पाहुणे भेटी देऊ लागले. त्यामध्ये फ्रेंच, जर्मन, स्पेन, अमेरिका, कॅनडाा येथील विविध पदाधिकारी व स्वयंसेवक यांचा समावेश असतो. फ्रेंच स्वयंसेवक दरवर्षी महिनाभर येऊन राहतात. मुलांबरोबर शिबिरे घेतात आणि एकमेकांच्या सांस्कृतिक वारशाची देवाण-घेवाण करतात. खूप आनंद-उत्सव असतो त्यावेळी शाळेत शालेय मुले फ्रेंच, जर्मन भाषेतील गाणी म्हणतात. फ्रान्समधून मॅध्यू नावाचा एक स्वयंसेवक येतो. वर्षभर पॉकेटमनी जमविण्यासाठी सफरचंद विकतो आणि भारतात येऊन शाळेतल्या मुलांसाठी तो आपला वेळ आणि पैसा खर्च करतो. मुलांबरोबर शिबीर घेतो. मॅध्यू सुंदर सेक्सोफोन नावाचे वाद्य वाजवितो. वैशिष्ट्य असे की, त्याला भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदाय खूप आवडतात. त्याने तुळशीची माळ घातली आणि संप्रदायाचे तत्त्वज्ञान, संतांचे तत्त्वज्ञान समजून घेतले. प्रमिलाताईंकडून तो दरवर्षी पंढरीची वारी करतो. आपल्या भारतातले कॅलेंडर परत जाताना बरोबर घेऊन जातो आणि तिथे एकादशी करतो. हे सारंच कसं वैशिष्ट्यपूर्ण. शाळेच्या प्रगतीत या सर्वाचे कार्य खूप महत्त्वाचे वाटते.
 
शाळेत आता डॉ. जनरल ब्रिगेडियर शशिकांत चित्रे यांच्या संकल्पनेतून सैन्य प्रशिक्षण सुरू आहे. त्यासाठी मिलिटरीचे एक निवृत्त मेजर शाळेत निवासी राहून मुलांना प्रशिक्षित करत आहेत. साहसी शिबिराचे आयोजन केले जात आहे. या कामगिरीबद्दल प्रमिलाताई यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार अलीकडच्या 5 वर्षांत मिळालेले आहेत. त्यामध्ये माळेगाव, बारामती येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन सेवा गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय वुमेन्स असोसिएशनचा पुरस्कार, निगडी रोटरी क्लब कार्य गौरव पुरस्कार, त्याचबरोबर नेशन बिल्डर टीचर अवॉर्ड  इ. असे लहान-मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यापुढे आदिवासी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान सुधारणे हाच आपला ध्यास असल्याचे प्रमिलाताई सांगतात.
 
-निलेश जठार