सैनिकांची मावशी अनुराधा प्रभुदेसाई!
   दिनांक :26-Apr-2019
कोरीबद्ध आयुष्य न जगता रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असणारा सैनिक व त्याच्यासाठी वेगळ्या वाटेवरील पथिक असणारी त्यांचे कार्य जनमानसात पोहोचवणारी सैनिकांची मावशी अर्थात अनुराधा प्रभुदेसाई!
त्यांच्या वाणीतून सगळे वातावरण राष्ट्रचैतन्याने भारावून जाते. सैनिकांची मावशी आपल्या प्रखर वाणीने व मध्ये संवेदनशील, हळवी होत सगळ्यांना राष्ट्र जागृती चा मंत्र जपणारी सौ. अनुराधा प्रभुदेसाई. एक मध्यमवर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब यातत रमलेली असताना 2004 ला सुट्टीत फिरायला कारगिलला जाते आणि द्रास इथून प्रवास करत असताना भारतीय सेनेचा एक बोर्ड तिचं लक्ष वेधून घेतो त्यावर लिहिलेलं असते-
 I only regret that I have one life to lay down for the country .
 
ते शब्द कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. चौकशी केल्यावर त्यांना कळते की- ‘आप को पता नही, यहां तो हजारो लाशे गिरी थी!’ हे शब्द त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करतात. आपलं सुखवस्तू आयुष्य जगताना ज्या देशात आपण रहातो, त्याच्या दुसर्‍या भागात काय झालं, ह्याची कल्पना आपल्याला नसतेच!
 
 
 
1999 कारगिलमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं; पण ती परिस्थिती जाणवली नाही कारण अवघ्या 20 ते 25 वयोगटातील तरुण मुलांनी इकडे रक्त सांडलं. त्यांनी आपल्या जिवाचा त्याग या देशाची इंच इंच भूमी वाचवण्यासाठी केला म्हणून आज आपण इकडे येऊ शकलो. या विचाराने अनुराधा प्रभुदेसाईंचं मन आतून कुठेतरी त्यांना विचारू लागलं की- तू यांच्यासाठी काय करू शकतेस? मग त्यांनी कारगिलच्या विजय स्तंभाच्या इथेच शपथ घेतली की- त्या तरुण सैनिकांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. या सैनिकांच्या बलिदानाची गाथा मी सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवेन. आणि हेच आजही वयाच्या या टप्प्यावर यथार्थपणे ते कार्य करतात आहेत. यानंतर जो सुरू झाला तो न थांबणारा प्रवास होता. कारगिलवरून परत आल्यावर अनुराधा प्रभुदेसाई यांनी भारतीय सेनेतील अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून रक्षाबंधनाला कारगिलला येण्याची परवानगी मागितली. सगळे सोपस्कार पूर्ण करून अनुराधा प्रभुदेसाई या रक्षाबंधनाला सैनिकांच्या भेटीला कारगिलला पोहोचल्या. सैनिक आणि तिथल्या सगळ्यांसाठीच हे सगळं नवीन होतं. एक सामान्य मध्यम वर्गीय स्त्री, एक सामान्य नागरिक आपल्या भेटीला इतक्या दूरवर सीमेवर येते, यातच सगळं काही आलं होतं. सैनिकांशी जुळलेल नातं मग अजून घट्ट होतं गेलं. त्या नंतर जो कारवा सुरू झाला तो अजूनही चालू आहे. आणि 2009 साली ‘लक्ष्य फाऊंडेशन’ची स्थापना झाली.
 
‘लक्ष्य’बद्दल लिहिताना अनुराधा प्रभुदेसाई त्यांच्या ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ या पुस्तकात लिहितात-
उद्याच्या आमच्यासाठी तो आज देतो तो हाच सैनिक .... जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाय ठेवता तेव्हा कळते की- इकडे एक पाऊल टाकणं पण किती कठीण असेल, त्याचा अनुभव प्रत्येक नागरिकाला देताना अनुराधा प्रभुदेसाई यांनी सैनिक आणि भारतीय नागरिकाला जवळ आणण्याचं काम केलं. त्याचं हे काम पाहून लोकं आज त्यांच्याबरोबर जुळत आहेत.
आज त्यांच्या माध्यमातून भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिक यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहे, जसे की युवा प्रेरणा, व्हॅलेंन्टाईन माय सोल्जर, प्रत्येक सैनिक एक पणती, सध्या त्यांचा मेरा देश मेरी पेहचान हा कार्यक्रम लोकांना आपल्या देशाची जाणीव करून देण्यासाठी सुरू आहे. भारताबाहेर जाऊन जर आपल्याला भारतीय असल्याची जाणीव होते किंवा भारताची आठवण होते तर मग भारतात राहून का नाही? या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते याचा उल्लेख करतात हे विशेष! आणि सर्व कार्यात त्यांच्या सोबत अनेकांचे योगदान आहे, असेच म्हणावे लागेल.
 
त्यांचा राष्ट्र जागरण आणि सैनिक व सेनेच्या कार्याचा गौरव कार्यक्रम यासाठी या वयातही त्यांचे संपूर्ण भारत भ्रमण सुरू आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य जोशपूर्ण असते आणि तो त्या सीमेवर लढणार्‍या जवानांसाठी आहे, याचा उल्लेख त्या आवर्जून करतात. सेनेचे कार्य 1 तासाच्या प्रेझेन्टेशनमधून सहजपणाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवीत आहेत. आणि त्यांच्या या माध्यमाला तरुण उत्साहाने प्रतिसाद देतात.
 
अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा प्रवास म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला आदर्श आहे. एक सामान्य स्त्री ठरवलं तर काय करू शकते ते व भारतीय सेनेतील प्रत्येक सैनिकाला समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांना अनकेदा निशब्द व त्यांच्या कार्याप्रति एक आत्मीयभाव निर्माण करतो.
 
ज्या स्वातंत्र्याची आज आपण फळे खातो आहोत. ज्या लोकशाहीमधील आपल्या कर्तव्यांबद्दल इतके जागरूक आहोत का आणि ते आज आपल्याला विरासत म्हणून मिळालेलं असलं, तरी ते टिकवण्यासाठी आजपण प्रत्येक क्षणाला आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिक आपलं रक्त सांडत आहे म्हणूनच ते टिकून आहे. त्याची जाणीव पण आपण आज ठेवत नसू तर आपल्यासारखं कृतघ्न आपणच! त्याच सैनिकाला, त्याच्या समर्पणाला सामान्य नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार्‍या अनुराधा प्रभुदेसाई यांना मानाचा मुजरा. आपले हे ईश्वरी कार्य आम्हा सारख्यांना सदैव प्रेरणा देणारे असावे हीच सदिच्छा!
जय हिंद!
-सर्वेश फडणवीस
9405347464