मोकाट सांडाचा अखिलेशच्या सभेत हैदोस
   दिनांक :26-Apr-2019
कन्नौज मतदारसंघात सपाच्या उमेदवार अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारसभेच्या ठिकाणी एक मोकाट सांड घुसल्याने एकच गहजब माजला. या लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या सपा-बसपा युतीच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आहेत.
त्यांच्या प्रचारार्थ अखिलेश यादव आणि मायावती यांची संयुक्त सभा कन्नौजमधील तिरवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सभेची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. अखिलेश आणि मायावती यांचे हेलिकॉप्टरही येण्याची वेळ झाली होती.

 
 
पण! हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी अचानक एक मोकाट सांड घुसला आणि तो गुर्रावू लागला. त्याला हाकलण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला. पण, तो पोलिसांच्याच अंगावर धावून जायचा. ज्याच्या काठी हाती त्याच्यामागे तो धावत सुटायचा. यामुळे एकच खळबळ माजली.
 
एक पोलिस सांडाला हाकलण्याच्या प्रयत्नात जखमीही झाला. यावेळी अखिलेश आणि मायावती यांचे हेलिकॉप्टर सभास्थानी येण्याच्या तयारीत होते. पण, खाली सांडाचा हैदोस सुरू असल्यामुळे त्यांना सांगण्यात आले की, सध्याच हेलिकॉप्टर खाली उतरवू नका. अर्धा तास ते तसेच फिरत राहिले. शेवटी अखिलेशने पोलिस महासंचालकांनाच फोन केला. पण, असे सांगितले की, काही लोक आमच्या सभेत गडबड निर्माण करीत आहेत. महत्प्रयासाने त्या सांडाला अखेर हाकलून लावल्यानंतरच हेलिकॉप्टर उतरले आणि सभा अर्धा तास विलंबाने सुरू झाली.