चीनने संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवला !
   दिनांक :26-Apr-2019
नवी दिल्ली,
अरुणाचल प्रदेशवर दावा करणाऱ्या चीननं आता एका नकाशामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे दाखवले आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)च्या दुसऱ्या समीटमध्ये चीनने  हा नकाशा प्रदर्शित केला आहे. या नकाशामध्ये चीनने पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग दाखवला आहे. या नकाशामध्ये भारताला BRIचा एक भाग दाखवण्यात आले आहे.
 
 
भारताने या समीटवर बहिष्कार घातला आहे. तत्पूर्वी २०१७मध्येही भारत BRIच्या पहिल्या समीटमध्ये सहभागी झालेला नव्हता. या समीटमध्ये ३७ देशांचा सहभाग आहे. BRI या प्रकल्पाचा उद्देश राज्यमार्ग, रेल्वे लाइन, बंदर आणि समुद्री मार्गाच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडण्याचा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या समीटची सुरुवात गुरुवारी झाली आहे. हा नकाशा चीनच्या कॉमर्स मिनिस्ट्रीने प्रदर्शित केला आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा दाखवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असलेले हजारो नकाशे नष्ट केले होते. चीनने उचललेल्या या पावलामुळे तज्ज्ञही पेचात पडले आहेत.