फिरंगी तडका
   दिनांक :26-Apr-2019
नमस्कार मंडळी! फिरंगी तडकाच्या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, मागील भागात आपण कोलंबिया या दक्षिण अमेरिकन देशाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घेतले. आज आपण उरुग्वे या देशात जाऊन तिथल्या खास पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. उरुग्वे हा देश दक्षिण अमेरिका खंडात आग्नेय दिशेला वसलेला आहे. सुरिनामनंतर हा देश दक्षिण अमेरिकेतील सर्वात लहान देश आहे. उरुग्वेच्या पूर्व व उत्तर दिशेला ब्राझील, पश्चिम दिशेला अर्जेंटिना आणि दक्षिण दिशेला अटलांटिक महासागर आहे. दक्षिण अमेरिकन देशांपैकी सर्वात प्रगत देशांमध्ये उरुग्वेचा क्रमांक लागतो. याचे एक कारण म्हणजे या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण नगण्य आहे. या देशाची राजधानी मोन्तेविदेओ असून हे या देशातील सर्वात मोठे शहर आहे. याच शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे. इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणेच इथलीदेखील अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या युरोपियन किंवा मिश्र वर्णाची आहे. टँगो हा जगप्रसिद्ध नृत्याचा प्रकार उरुग्वेतच जन्माला आला आहे.
तुम्हाला माहीत आहे का, उरुग्वे या लहानशा देशात वाईनचे भरपूर प्रमाणात उत्पादन होते? 20 हजार एकरांपेक्षाही जास्त शेतजमिनीवर वाईनसाठी द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते आणि वाईनचे उत्पादन करण्यासाठी मोठमोठ्या वायनरीज आहेत. दक्षिण अमेरिकेतील पहिल्या पाच वाईन उत्पादकांमध्ये उरुग्वेचा पाचवा क्रमांक लागतो. यात अर्जेंटिना, ब्राझील, चिली आणि पेरू हे अनुक्रमे पहिले चार देश आहेत. मोन्तेविदेओच्या आजूबाजूच्या कॅनेलोन या प्रदेशात कॉन्सन्ट्रेटेड वाईन तयार होते.
यर्बा मेट हे उरुग्वेमधील सर्वात लोकप्रिय पेय आहे. हे लोक घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात, मीिंटगमध्ये, रस्त्यावर अगदी कुठेही असले तरी हेच पेय घेणे पसंत करतात. यर्बा मेट हा उरुग्वेच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हेच पेय उरुग्वेचे राष्ट्रीय पेय आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. या पेयाचा जगात सर्वात जास्त खप याच देशात होतो, असे आकडे सांगतात. तसेच चिव्हिटो हा या देशाचा राष्ट्रीय पदार्थ आहे. यात मोझरीला चीझ, टोमॅटो, ऑलिव्हज, अंडी, मेयोनीज व बीफ घातलेले असते. एखाद्या बर्गर किंवा सॅण्डविचसारखा हा पदार्थ असतो आणि या चिव्हिटोबरोबर फ्राईज सर्व्ह केल्या जातात.
तुम्ही उरुग्वेमध्ये गेलात तर तिथल्या लोकांकडून तुम्हाला कायम ‘रोतीसिरियाज’ हा शब्द ऐकायला येईल. इथले लोक इथल्या रेस्टॉरंटला रोतीसिरियाज म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला पारंपरिक उरुग्वेन पदार्थांचा आस्वाद घेता येईल. ही लोकांच्या भेटीची जागा आहे. या ठिकाणी ऑफिशियल मीिंटगसुद्धा होतात किंवा मित्रमैत्रिणी, नातलगसुद्धा एकमेकांना भेटून मस्त पारंपरिक रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतात. तॉर्ता दे एस्पिनाका, पापास आणि पसक्वालिना असे पारंपरिक पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात.
 
उरुग्वेन फ्राईड केक्स (डोनटस्‌)
साहित्य- 2/3 कप आटवलेले दूध, 3 टेबलस्पून बटर, 2 कप मैदा, 1 टेबलस्पून बेिंकग पावडर, दीड टीस्पून मीठ, तळण्यासाठी तेल, आवश्यकतेनुसार पिठीसाखर वरून भुरभुरवण्यासाठी, कॅरॅमल िंकवा फ्रुट मार्मालेड (डोनटस्‌बरोबर खाण्यासाठी)
कृती- मायक्रोव्हेवमध्ये िंकवा गॅसवर आटवलेले दूध आणि बटर एकत्र करून थोडेसे गरम करून घ्या. बटर वितळले की भांडे गॅसवरून काढून घ्या. एका मध्यम आकाराच्या भांड्यात मैदा, बेिंकग पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या. यामध्ये विहीर करून त्यात हे गरम केलेले आटवलेले दूध घाला आणि लाकडी चमच्याने एकत्र करून घ्या. हळूहळू एक मऊ गोळा तयार होईल. हा गोळा आता हाताने व्यवस्थित मळून घ्या. गरज पडल्यास थोडे पाणी घालू शकता. या गोळ्याचे 12 भाग करा आणि गोळे करून घ्या. लाटण्याने या गोळ्यांची जाडसर छोटी पुरी लाटून घ्या आणि त्यावर बोटाने मधोमध छिद्र करून घ्या. कढईत तेल गरम करून घ्या आणि हे डोनटस्‌ गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या. आता डोनटस्‌ गरम असतानाच त्यावर पिठीसाखर घाला आणि कॅरॅमल िंकवा फ्रुट मार्मालेडबरोबर गरमागरम सर्व्ह करा उरुग्वेन फ्राईड केक्स!
 
 
एकोणिसाव्या शतकात स्पेन आणि इटली येथील वसाहतवादी लोक या ठिकाणी आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पदार्थ आणि त्यांच्या स्वयंपाकाच्या पद्धतीसुद्धा घेऊन आले. त्यामुळे इथल्या खाद्यसंस्कृतीत त्यांचे पदार्थसुद्धा दुधात साखरेप्रमाणे सामावून गेले.
उरुग्वेन लोकांना जेवणात मांस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे असादो हा त्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. बीफ, चिकन, पोर्क असे विविध प्रकारचे मांस बार्बेक्यू करून खायला इथल्या लोकांना आवडते. तसेच हे लोक विविध प्रकारचे सॉसेजेससुद्धा खातात. असादो हा केवळ एक पदार्थ नसून हा त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या खास प्रसंगी जेव्हा भरपूर माणसे जेवणासाठी एकत्र जमतात तेव्हा असादो म्हणजेच बार्बेक्यूचा बेत असतो. ज्या व्यक्तीवर बार्बेक्यू मीट तयार करण्याची जबाबदारी असते तिला असादोर म्हटले जाते.
बार्बेक्यूप्रमाणेच उरुग्वेमध्ये विविध प्रकारचे पास्तादेखील खाल्ले जातात. जेव्हा कौटुंबिक प्रसंग किंवा गेट टुगेदर्स असतात तेव्हा आवर्जून पास्त्याचे प्रकार केले जातात. रविवारच्या जेवणातसुद्धा आवर्जून पास्ता असतोच. कापेलेतीस अ ला कारुसो हा पास्त्याचा उरुग्वेन प्रकार आहे. या पास्त्यामध्ये मांसाचे सारण भरलेले असते आणि याचे ड्रेिंसग खास उरुग्वेमध्येच तयार झाले असल्याने हा उरुग्वेन पास्ता समजला जातो. या सॉसमध्ये क्रीम, कांदे, मशरूम, हॅम, चीझ आणि मांस असते. खरं सांगायचं झालं, तर या लोकांना मांस इतकं प्रिय आहे की, हे लोक मांसाशिवाय कुठलाही पदार्थ खायला तयार होत नाहीत! त्यांच्या मते, एखाद्या पदार्थात मांस नसेल तर तो अस्सल उरुग्वेन पदार्थच नव्हे!
उरुग्वेन लोकांच्या आवडीचा आणखी एक पदार्थ म्हणजे ऍर्रो कॉन लेचे म्हणजे राईस पुिंडग होय. थोडक्यात ही उरुग्वेन तांदळाची खीर आहे. हा पदार्थ करण्यासाठी तांदूळ, दूध, अंडी आणि साखर इतकेच जिन्नस लागतात. हे एक पारंपरिक उरुग्वेन डेझर्ट आहे. सर्व्ह करताना यावर थोडीशी दालचिनीची पूड घालून दिली जाते ज्यामुळे पदार्थाची लज्जत वाढते. कधीकधी या तांदळाच्या खिरीबरोबर दुल्से दे लेचे म्हणजेच कॅरॅमलसुद्धा सर्व्ह केले जाते. या लोकांना कॅरॅमल इतके आवडते की, ते कुठल्याही उरुग्वेन गोड पदार्थाबरोबर कॅरॅमल खाऊ शकतात. उरुग्वेन खाद्यसंस्कृतीबाबत जाणून घेण्यासारख्या अनेक रंजक गोष्टी आहेत, पण त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ. भेटू पुढील भागात तोवर ऍस्ता ल्यूएगो म्हणजेच बाय बाय!
- वैदेही राजे जोशी