आदर्श सून
   दिनांक :26-Apr-2019
व्यक्ती ही समाजात जन्माला येते, समाजातच तिची वाढ होते आणि विकासही होतो. एकूणच व्यक्तीच्या घडणीमध्ये समाजाचे मोठे योगदान असते. समाजातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंबसंस्था! ही संस्था समाजाचा आधार आहे कारण या संस्थेवरच समाजाचे अस्तित्व अवलंबून असते. कुटुंबसंस्था ज्या घटकाभोवती गुंफलेली असते, तो घटक म्हणजे व्यक्ती! व्यक्तीचा जन्मापासून मरेपर्यंतचा फार मोठा कालखंड हा कुटुंबातच जात असतो. सहाजिकच कुटुंब कसे, त्यातील व्यक्तिकथा, त्यांचे आदर्श, त्यांचे संस्कार, त्यांची वागणूक यावरूनच त्या व्य्तीचे व्यक्तिमत्त्व तयार होत असते. व्यक्ती जन्माला आल्यापासून मग ती स्त्री असो की पुरुष तिला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. पुरुष असेल तर मुलगा, पिता, बंधू सहकारी अशा कितीतरी तर मुलगी जन्माला आली तर आई, बहीण, पत्नी, सून, सासू आणि इतर अनेक भूमिका कुटुंबात तिला पार पाडाव्या लागतात.

मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे, हे आपणास माहीतच आहे. मनुष्य जन्मत: काही गुण-दोष घेऊन जन्माला येत असला, तरी इतर आपल्या सभोवतली असणार्‍या व्यक्तीचे तो अनुकरण करीत असतो. घरात जर आजी-आजोबा असतील तर नातवंडांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडलेला आपणास दिसतो म्हणूनच जन्मत: व्यक्ती कशी आहे, यापेक्षा तिच्यावर जे संस्कार घडतात, त्यावरून ती कशी होते, हे महत्त्वाचे आहे.
लेखाचा विषय स्त्री असल्यामुळे स्त्रीविषयी विचार करणे महत्त्वाचे आहे. स्त्रीच्या भूमिकेतील सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे ‘आई!’ आई कशी असावी याची सुंदर व्याख्या समर्थ रामदासांनी केली आहे.
आलस्य नाही, कंटाळा नाही।
वीट नाही त्रास नाही।
इतुकी माया कोठेची माते वेगळी।। आईमध्ये कोणते गुण विशेषत्वाने असावे' ते समर्थ या ठिकाणी सांगतात. आईमध्ये आळस नसावा, कोणत्याही गोष्टीचा कंटाळा नसावा, कोणत्याही गोष्टींचा वीट नसावा, त्रास नसावा आणि तिच्या वागण्या बोलण्यातून अपत्याविषयी मायाच बाहेर पडावी असे समर्थ सांगतात. आई जे मुलांसाठी कष्ट घेते, त्याला जगात तोड नाही.
दुसरी स्त्रीची महत्त्वाची भूमिका म्हणजे ‘पत्नीची़!’ कुटुंब सांभाळणे, घरातील कामे करणे हे स्त्रीचे मुख्य कर्तव्य असते. गृहिणी ही व्यवस्थापनाची गुरू समजली जाते. कोणते काम कसे करावे, कोणाकडून, केव्हा करून घ्यावे, ती उत्तम जाणत असते. घरातील प्रत्येकाचा स्वभाव पाहून ती हे सर्व करीत असते. कुटुंबातील पुरुष पैसा कमवून आणीत असला तरी त्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे स्त्रीच उत्तम प्रकारे जाणते. घरातील अडीअडचणीला मदतीचा प्रथम हात पुढे येतो-तो गृहीणीचाच! घरातील कामे करून सर्वांना सुखी समाधानी ठेवणे, ही भूमिका देखील स्त्रीलाच पार पाडावी लागते.
 
स्त्री जी घरातील कामे करणारी असो वा बाहेरची कामे करणारी असो ती नेटकी असावी. अचूक प्रयत्न करणारी असावी. या व्यतिरिक्त तिच्यामध्ये आणखी काही गुण असावे.
स्त्रीमध्ये शक्ती, युक्ती, विशेष बुद्धी असावी. कार्यभागाचा संतोष म्हणजे करीत असलेल्या कामाविषयी समाधान, आवड असावी, आळस नसावा. तिचा स्वयंपाक असा असावा की- त्यातून घराचे आरोग्य उभे राहिले पाहिजे. कारण स्त्रीच्या स्वयंपाकावर घराचे, कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते. कोणतेही काम करताना त्यामागची आपली भावना कशी आहे,. ते काम करताना आपण कोणते विचार करतो, या सर्वांचा परिणाम त्या कामावर होत असतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भगवंतही तेच म्हणतात. त्यांना पूजा अर्चापेक्षा आपला भाव महत्त्वाचा वाटतो. भाव तेथे देव, असे म्हटलेच आहे.
स्त्री अशाप्रकारे वेगवेगळ्या भूमिकेतून आपले जीवन जगत असते. मुलगी म्हणून जगत असताना आपली आई, आपली आजी कशी वागते, कशी बोलते याचा प्रभाव तिच्यावर पडत असतो. ते संस्कार घेत घेतच ती मोठी होते. लहानपणी खेळभांडे खेळताना आई स्वयंपाक करताना िंकवा इतर कामे करताना कशी वागते तशीच मुलगी खेळभांडे खेळताना वागताना दिसते. एवढेच नव्हे, तर आई आजीची वाक्येच ती म्हणताना दिसते. मुलीवर शिक्षकांचही प्रभाव मोठा असतो. त्यांचे वागणे, बोलणे यातूनही मुली खूप शिकत असतात.
 
या सर्व प्रस्तावनेवरून हे लक्षात येतं की- ज्या सासू-सूनेच्या नात्यासंंबंधी आपण विचार करतो, तेव्हा कोणतीही स्त्री कायम सासू नसते वा कायम सून नसते. प्रथम सून म्हणून भूमिका करणारी पुढे सासू होते. म्हणजे एकच स्त्री सूनही असते आणि सासू असते. त्यामुळे प्रथम ती एक आदर्श स्त्री म्हणून तयार झाली तर सून म्हणूनही भूमिका चांगली वठवेल आणि पुढे सासू म्हणवूनही चांगली भूमिका वठवेल. कारण तिने सुनेचे सुख दु:ख अनुभवलेच असतात. त्यामुळे सुनेचे कष्ट, तिची नवीनता, तिला समजून घेण्याची आवश्यकता हे सर्व तिला माहीतच असते. या सर्व अवस्थांमधून ती गेलेी असते. त्यामुळे तिला त्याची जाणीव नसते असे नाही उलट असे म्हणता येईल की, सासू सुनेला जास्त चांगले समजून घेऊ शकते पण गरज आहे, ती दृष्टी बदलण्याची! आपल्या विचारांची दिशा बदलण्याची. कोणतीही सून मुळात वाईट नसते व कोणतीही सासू मुळात वाईट नसते. पण एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी व त्यामागचा मनात येणारा विचार जर आपण बदलला तर मात्र हे सहज शक्य होते.
 
प्रथम आपल्या मनात विचार येतो. विचाराप्रमाणे उच्चार करतो व उच्चाराप्रमाणे कृती घडते. म्हणून आपल्या मनातील विचारांवर लक्ष केंद्रीत केले आणि जे आपण डोळ्यांनी पाहतो त्यामागचा विचार जर चांगला असेल तर आपणास काहीच वाईट दिसणार नाही. एखादी स्त्रीची मूर्ती असते कोणाला ती आईची वाटते. कोणाला ती देवीची वाटते. कोणाला आपल्या पत्नीसारखी वाटते. मूर्ती एकच फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र निराळा. त्यामुळे ती वेगवेगळी वाटते. तसेच स्त्रीचे आहे. स्त्री एकच तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
 
स्त्री बाबतीतही सासू आणि सून नातं कधी न पटणारं आहे असेच संस्कार आपण लहानपणापासून मुलींवर अनेक कथातून, भुलाबाईच्या गाण्यामधून, मंगळागौरीच्या गाण्यातून िंबबवत आलो आहोत. त्यामुळे ती लग्न होऊन उंबरट्यावरचे माप ओलांडून आपल्या घरात येताना सासूबाई विषयीचा एक पक्का विचार घेऊनच आत येते. त्यामुळे सासूची प्रत्येक गोष्ट तिला वाइट, चुकीची दिसते. सासू देखील सूनही वाईटच असाच विचार करून तिला घरात घेते, त्यामुळे तिची दृष्टीही तशीच विकृत होते. असे विकृत विचार पक्के नकता एकमेकींशी सामंजस्याने तिच्या भूकिेत जाऊन आपल्या भूतकाळातील घटना आठवून त्याचा योग्य विचार करून जर आपण वागलो तर कोणताही अभ्यासक्रम करण्याची, शिकण्याची गरज नाही. आपलं घर हेच संस्कार केंद्र आहे. त्यातच आपले व्यक्तिमत्त्व, आपले विचार तयार होतात ते चांगले झाले तर आपली प्रत्येक भूमिका ही योग्य प्रकारे पार पाडल्या जाऊ शकते. दोघींनी एकमेकींना समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येकीचा विचार केला तर हे सहज शक्य होते व ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे लक्षात ठेवले तर दोघीचाही भार हलका होऊन दोघीही आनंदाने राहू शकतात. आणि एक महत्त्वाचे वाक्य संसारात आवश्यक असते ते म्हणजे- ‘ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।।’ हेही फार महत्त्वाचे आहे. आमच्या वेळेला असे होते, आमच्या वेळेला तसे होते, मला हे पटतच नाही या वाक्याचा विसर पडणे महत्त्वाचे आहे. जुन्याचा आदर, नवीन विचारांचे स्वागत यांचा समतोल म्हणजे एक आदर्श कुटुंब असते. पिढीपिढीतील अंतर हे प्रेमाने, मायेने भरून काढले तर दोन पिढ्यांचा सुरेख संगम हा तिसर्‍या पिढीसाठी आदर्श ठरतो व या आदर्शाचे परिणाम तिच्यावर चांगलेच होतील. समाजातून जेव्हा वृद्धाश्रम आणि पाळणाघर नाहीसे होतील, तेव्हा समाजातील कुटुंब व्यवस्था ही बळकट होऊन सुद्धा समाज अस्तित्वात येईल. हे होणारच फक्त थोडे आपले विचार बदला, बघण्याचा दृष्टिकोन बदला. कोणाचेही डोळे झाकून अनुकरण करू नका. पाश्चात्य विचारांपेक्षा भारतीय विचारसरणी केव्हाही श्रेष्ठ आहे. तिचे वाचन, आचरण हेच आपल्या यशाचे वैभवाचे गमक आहे.
 
-डॉ. प्रज्ञा पुसदकर
9423733630