ipl २०१९ : मुंबईची आज चेन्नईशी झुंज

    दिनांक :26-Apr-2019
चेन्नई ,
 
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले असले तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचा नेहमीच कस पणाला लागतो. त्यामुळे शुक्रवारी चेपॉक स्टेडियमवर जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतील, तेव्हा क्रिकेटप्रेमींना कडव्या संघर्षांची अपेक्षा असेल.
सलग दोन सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर चेन्नईने मागील लढतीत सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून आठ विजयांसह गुणतालिकेच्या अग्रस्थानी झेप घेतली. शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांना सूर गवसल्यामुळे चेन्नईच्या चिंता कमी झाल्या आहेत. स्वत: धोनी संघासाठी भरीव योगदान देत असल्यामुळे साहजिकच घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या लढतीत चेन्नईचे पारडे जड आहे.
 
 
दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी मुंबई १० सामन्यांतून सहा विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितला अद्याप यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. मात्र हार्दिक पंडय़ा व क्विंटन डी’कॉक संघासाठी सातत्याने योगदान देत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा अपेक्षेप्रमाणे बळी मिळवत आहे. परंतु फिरकीपटू राहुल चहर यंदा सर्वाचे खास आकर्षण ठरत आहे. आतापर्यंत सात सामन्यांतून त्याने १० बळी मिळवले आहेत. या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत करण्यासाठी मुंबईचे खेळाडू सर्वस्व पणाला लावतील. त्यामुळे शुक्रवारी मुंबईचे फलंदाज विरुद्ध चेन्नईचे फिरकीपटू यांच्यातील द्वंद्व पाहणे रंजक ठरेल.
संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, एव्हिन लेविस, लसिथ मलिंगा, मयांक मरकडे, मिचेल मॅक्क्लिनॅघन, ब्युरन हेंड्रिक्स, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर शरण, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक).
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, स्कॉट कुगेलिन, एन. जगदीशन.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १