एमएचटी-सीईटी प्रवेशपत्र लॉग इनमध्ये उपलब्ध

    दिनांक :26-Apr-2019
 
पुणे: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तंत्रज्ञान व मत्स्य, दुग्ध व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी असणारी एमएचटी-सीईटीचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट संबंधित विद्यार्थ्यांना लॉग-इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. एमएचटी सीईटी परीक्षा 2 ते 13 मे या कालावधीत पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होत आहे. परीक्षेसाठी हॉल तिकीट आवश्यक सूचनांसह विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये तफावत, दुरुस्ती असल्यास त्याबाबत संबंधित विद्यार्थ्याने हमीपत्र परीक्षा केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेस बसण्यास अडचण निर्माण होणार नाही. नावामधील बदल, विद्यार्थ्याचे छायाचित्र, विद्यार्थ्याची सही आदीमध्ये दुरुस्ती असल्यास विहित केलेल्या प्रपत्रात हमीपत्र आवश्यक आहे. परिणामी, त्या कागदपत्रावरून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देणे सुकर होईल, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. याबाबतची सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.