सोमठाणा येथील नऊ घर आगीत जळून खाक
   दिनांक :26-Apr-2019
  
संसारपयोगी साहित्य जळून खाक 
लाखोचे नुकसान
 
 
मानोरा: तालुक्यातील सोमठाणा येथील भायजीनगर येथील घरांना शेतातील धुरा पेटविल्यामुळे आग लागली. त्यामध्ये लगतची  नऊ घरे आगीत भस्मसात झाली. यामध्ये संसारपयोगी साहीत्य जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी मंगरुळनाथ व कारंजा येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. महत प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही घटना आज सकाळी ९.३० वाजताचे सुमारास घडली.
 
 
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मानोरा शहरालगत असलेल्या सोेमठाणा ग्रामपंचायत हद्दीतील भायजी नगर लगत शेती आहे. सबंधित शेतकर्‍याने शेतातील धुरे पेटवून दिले. शेती लगत असलेल्या जळतनासाठी ठेवलेल्या इंधनाने पेट घेतला. पाहता पाहता आगीने उग्ररुप धारण केले आणि लगतची घरे आपल्या विळख्यात घेतली. गावकर्‍यांनी पाण्याचे टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग विझत नसल्यामुळे मंगरुळनाथ व कारंजा येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्नाने आग आटोक्यात आली असली तरी लगतच्या नऊ घरांना आग लागून मोठे नुकसान झाले. त्यातील संसारपयोगी साहीत्य, जळून खाक झाले. यामध्ये देवानंद शामराव वाघमारे, अरुण विश्‍वनाथ कांबळे, गजानन चंपत सोनुने, अरुण सुखदेव पखमोडे, गुलाब सयाजी मोरकर, सुरेखा गजानन सोनुने, महादेव बापुराव फुडवे, रामराव बिरम भीसनकर, अशोक उत्तम कोल्हे आदींचे घराला आग लागली असून, संसार उघड्यावर आले आहे.
घटनेची माहीती कळताच तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानग्रस्तांना शासनाच्या आपाद्ग्रस्त निधीतून लवकरच मदत दिल्या जाईल, असे सांगीतले.