आज पुण्यासाठी शतकातला सर्वात उष्ण दिवस

    दिनांक :26-Apr-2019
 
पुणे : एरवी तापमानाची विशेष दाहकता न अनुभवणाऱ्या पुणेकरांसाठी आजचा दिवस मात्र कधीच न अनुभवला इतका उष्ण ठरला. आज पुण्यात ४२.६ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. यापूर्वी १८९७ सालच्या एप्रिल महिन्यात ४३.३ इतक्या तापमानाची नोंद झाली होती. यानंतर आज पुण्यातील तापमानाच्या पाऱ्याने इतका उच्चांक गाठला आहे. यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असेल तर मे महिन्यात काय होईल, अशी चिंताही अनेकांना सतावू लागली आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास यापूर्वीचे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.
 
 
 
पुणे वेधशाळेने गुरुवारीच उष्णता लाटेमुळे राज्यातील तापमान वाढणार असल्याचा इशारा दिला होता. पुण्यातील तापमान फारतर ४२ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज होता. मात्र, शुक्रवारी त्यापेक्षाही जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. वेधशाळेच्या माहितीनुसार, कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात वाढ होत असल्यामुळे रात्रीही उकाडा वाढलेला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.