मतदान केल्याचा सेल्फी पाठवा आणि मोफत सर्व्हीसिंग मिळवा !
   दिनांक :26-Apr-2019
 
मुंबई: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून जाहीराती, कॅम्पेनिंगवर लाखो रुपये खर्च केला जातोय. मतदारांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या राजकीय पक्ष लढवत आहे. या सर्वात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समाजातले काही जागरूक नागरिकही पुढे येत आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या जोडीला अनेक सेवाभावी संस्था, दुकानदार, व्यावसायिक प्रयत्न करत असतात. परळच्या ओमकार भोवर या तरुण उद्योजकानेही मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी आवाहन केले आहे. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकाला त्याच्या 'बुलेट वर्ल्ड' मध्ये बुलेटची एक सर्व्हीस मोफत मिळणार आहे.
 

 
 
परळच्या केईएम रुग्णालयाजवळ ओमकारचे 'बुलेट वर्ल्ड' नावाचे गॅरेज आहे. या ठिकाणी बुलेट सर्व्हीसिंगचे काम होत असते. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ओमकारने केलाय. सध्या बुलेट चालवणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या बुलेट करांना जागृत मतदार करण्यासाठी ओमकार प्रयत्न करतोय. स्वत:कडे बुलेट असणे हे जसे आपण अभिमानाने सांगतो त्याप्रमाणे मतदान केलंय हे देखील तितक्याच गर्वाने तरुणांनी सांगावे असे ओमकारला वाटते. तुम्ही जर बुलेट सर्व्हिसिंगला कोणत्याही गॅरेज, किंवा बुलेट सेंटरमध्ये गेलात तर साधारण 1800 ते 2000 रुपयांपर्यंतचा खर्च तुम्हाला येतो. पण जर तुम्ही मतदान करुन त्याचा पुरावा 'बुलेट वर्ल्ड' ला दिलात तर तुमचा हा बुलेट सर्व्हिसिंगचा खर्च वाचणार आहे. मतदान केल्यानंतर मोफत सर्व्हीसिंग मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा एक सेल्फीhttps://form.jotform.me/91122283590453 या लिंकवर पाठवावा लागणार आहे.