विदर्भ तापला; अकोला सर्वाधिक उष्ण
   दिनांक :26-Apr-2019
 
 नागपूर: संपूर्ण विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून, कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच अनेक भागांत पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आज विदर्भात अकोला येथे सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधिक उन्ह तापत असल्याने अकोलेकर त्रस्त झाले आहेत.
येत्या 30 एप्रिलपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचे तीव्र चटके जाणवणार आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अकोल्याच्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे 45.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. उपराजधानी नागपूर शहरात 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरकरांना उन्हाचे चटके असह्य झाले असून, दुपारच्या वेळी तर रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट असतो.
 

 
 
 
गेल्या मोसमात विदर्भात सगळीकडेच पाऊस कमी पडला. त्यामुळे अनेक भागांत तर पावसाळ्यापासूनच पाणी टंचाई जाणवत होती. आता उन्हाचा जबरदस्त तडाखा बसत असल्याने पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे. वर्धा येथे 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्याखालोखाल चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. विदर्भात सगळीकडे वातावरण अतिशय कोरडे राहील आणि नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढतच जाईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
अमरावती शहरात 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्या खालोखाल यवतमाळ येथे 44.5 एवढे तापमान नोंदविण्यात आले. उद्या, शनिवारी 27 एप्रिल रोजी अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना लोकांना करावा लागेल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे तर जिल्ह्यांतही नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.
वाशिम शहरात 44.2, गोंदिया 43.8, गडचिरोली 43.2, बुलडाणा 43.1 अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ही परिस्थती 1 मे च्या सकाळी साडेआठपर्यंत कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने लोकांमध्ये चिंतेचे  वातावरण आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरेही त्रस्त झाली असून, त्यांच्याही जीवाची लाहीलाही होत आहे.
वाढत्या उन्हाचा नागरिकांना होत असलेला त्रास कमी व्हावा, यासाठी अनेक ठिकाणी सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असून, पाणपोईसह अनेक प्रकारचे उपाय त्यांनी केले आहेत. अनेक ठिकाणी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची अन्‌ चार्‍याची सोय करण्यात आली आहे.