श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमागे मसाला व्यापाऱ्याच्या कुटुंबाचा हात
   दिनांक :26-Apr-2019
श्रीलंकेमध्ये इस्टर संण्डेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बहल्ल्यांमागे  देशातील लोकप्रिय मसाला व्यापाऱ्याची मुले असल्याचे धक्कादायक माहिती तपासात समोर आले आहे. मसाला व्यापारी मोहम्मद यूसूफ इब्राहिम यांना या हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोहम्मद यांची मुले इल्हाम अहमद इब्राहिम आणि इमसथ अहमद इब्राहिम या दोघांनी स्वत:ला शांगरी-ला आणि सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आत्मघाती हल्ला करत स्फोट घडवून आणला. बंगले, गाड्या, अमाप संपत्ती असणाऱ्या या कुटुंबातील दोन मुलांनी स्वत:ला उडवून दिले तर सुनेही स्वत:ला उडवून देत स्फोट घडून आणला. स्फोटात सहभागी असणारे सर्वच आत्मघाती हल्लेखोर हे इब्राहिम कुटुंबाच्या मित्र परिवारातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
 
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार तपास अधिकारी पुरावे गोळा करण्यासाठी मोहम्मद यांच्या कोलंबो येथील बंगल्यात गेले असता तेथेही एक स्फोट झाला. महावेला गार्डन्स या उच्चभ्रू वस्तीमधील व्हाइट हाऊस नावाच्या बंगल्यामध्ये हा स्फोट झाला. या बंगल्यात मोहम्मद यांचे संपूर्ण कुटुंबाचे वास्तव्य होते. पोलीस चौकशीसाठी या बंगल्यात गेले असता तेथे मोहम्मद यांची सून फातिमा हिने स्वत:ला आपल्या तीन मुलांसहीत उडवून देत आत्मघाती स्फोट घडवल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
मोहम्मद यांनीच आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी प्रेरित केल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी उकसवणाऱ्या आणि मदत केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद यांना अटक करण्यात आल्याची माहिती सीएनएनला पोलीस प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी दिली आहे. या दोन भावांशिवाय इतर सात जणांचाही मोहम्मद कुटुंबाशी संबंध असून ते या कुटुंबाच्या मित्र परिवारापैकीच होते अशी शक्यता असल्याचे गुणशेखर यांनी सांगितले आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये स्वत:ला उडवून देणाऱ्या इल्हामला पोलिसांनी आधी एका प्रकरणात अटक केली होती अशी माहिती एक सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये इस्टरच्या सकाळी ब्रेकफास्टच्या रांगेत उभ्या असणाऱ्या इल्हामने स्वत:ला उडवून देत स्फोट घडवला. या दोन्ही भावांपैकी एकजण आधी ब्रिटनमध्ये आणि नंतर मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियात जाऊन शिक्षण घेऊन परत आला होता अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.