अर्थ शंकराच्या शरीरावरील प्रतिकांचे
   दिनांक :27-Apr-2019
 जाणून घ्या 
 
भगवान शंकराबद्दल भक्तांच्या मनात कुतुहल आहे. तांडवनृत्य करणारी, प्रसंगी तिसरा डोळा उघडणारी ही देवता भक्तांच्या आराधनेने प्रसन्न होते. शंकराला भोळा सांब म्हटलं जातं. शंकराने आपल्या शरीरावर विविध गोष्टी धारण केल्या आहेत. त्याच्या माथ्यावर चंद्र आहे. त्याच्या हातात डमरू आहे. गळ्यात रूद्राक्षाची माळ आहे. शंकराने धारण केलेल्या प्रत्येक प्रतिकाचं वेगळं महत्त्व आहे. या प्रतिकांविषयीची ही रंजक माहिती... 
 
 
शंकराने आपल्या जटेत चंद्र धारण केलाय. शिव हे तत्त्व मानसिक विकारांपासून दूर आहे. चंद्र मनाचं प्रतिक मानला जातो. मनोविकारांपासून दूर गेलेला मनुष्य भगवंताचं निर्गुण रूप जाणून घेऊ शकत नाही. या स्थितीला समजून घेऊ शकत नाही. भगवंताला समजून घेण्यासाठी मनाचा थोडा तरी विचार करावा लागतो. अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी शंकराने माथ्यावर चंद्र धारण केलाय.
  • शंकराचा डमरू या ब्रह्मांडाचं प्रतिक मानलं जातं. ब्रह्मांड विस्तारतं आणि विलिन होत जातं. ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. हाच या सृष्टीचा नियम आहे. हृदयाची धडधड कधीही सरळ रेषेत नसते. या धडधडीला एक लय असते. हे संपूर्ण जगच लयीत चालतं. ऊर्जा वर जाते, पुन्हा खाली येते. अशा प्रकारे तिचं पुनरूत्थान होत असतं. डमरू याच लयीचं प्रतिक आहे. डमरू हे ध्वनीचं प्रतिक आहे. ध्वनी लय आहे. ध्वनी ऊर्जाही आहे. आपलं ब्रह्मांड लहरींचा पुंजका आहे. यात वेगवेगळी कंपनं आहेत. डमरू ब्रह्मांडाच्या याच स्वभावाचं प्रतिक मानलं जातं.
  • गळ्यातला नाग समाधीवस्थेचं प्र्रतिक आहे. समाधीवस्थेत माणसाला कशाचंच भान रहात नाही. याच ठिकाणी शिवाचं अस्तित्त्व असतं. या अवस्थेत आपण सजग असतो पण कर्मांची कोणतीही जाणीव नसते. याच सजगतेचं प्रतिक म्हणजे शंकराच्या गळ्यातला सर्प.
  • शंकराचं त्रिशूळ चेतनेच्या तीन अवस्थांचं प्रतिनिधित्त्व करतं. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति या त्या तीन अवस्था होत. यासोबतच सत्व, रज आणि तम या गुणांचंही ते प्रतिक आहे. शूल म्हणजे समस्या किंवा दु:ख. त्रिशूळ म्हणजे सर्व पिडांचा नाश करणारं. हे त्रिशूळ शंकराने धारण केलंय.
  • शिवाने जटेत गंगा धारण केली आहे. गंगा म्हणजे ज्ञान. या ज्ञानामुळे आपला आत्मा शुद्ध होतो. गंगा हे शुद्धतेचं प्र्रतिक मानलं जातं. मस्तकात ज्ञान असतं. ज्ञान मुक्तीदायी आहे. ज्ञानामुळे आपण शुद्ध होतो. ज्ञानामुळे आत्मविश्वास जागृत होतो. ज्ञानात गती आहे, धार आहे. म्हणूनच गंगा हे ज्ञानाचं आणि शिव हे दिव्यतेचं प्रतिक मानलं जातं.
  • नंदी बैल हे शिवाचं वाहन आहे. बैलाला धर्माचं प्रतिक मानलं जातं. शिवाचं नंदी बैलावर आरूढ होणं धर्म आणि सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचं प्रतिक आहे.
  • शंकराचं शरीर निळं आहे. निळं म्हणजे असीम, अनंत. आकाशासारखं. निळा रंग अनंताचं प्रतिक मानलं जातो. याचं कोणतंही रूप नाही. तसंच शिवाचंही शरीर नाही. शिवाचं कोणतंही रूप नाही. संपूर्ण जग शिवमय आहे. हे ब्रह्मांड शिवाचं रूप आहे.
  • शिवाचं तांडव नृत्य चेतनेचं प्रतिक आहे.