भक्ती म्हणजे नेमके काय?
   दिनांक :27-Apr-2019
डॉ. कल्पना पांडे
9822952177
 
दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एका मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक एक वारी उपवास. बाकी वेळा दुसर्‍यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे बोलणे, अहंकार, गर्व, अपशब्द आणि... ही नाही भक्ती. भक्तीच्या नावाखाली सक्ती, सगळे करतात म्हणून आपणही करायची ती सक्ती. भक्तीमध्ये शक्ती हवी, सक्ती नाही.
 
कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देताना पाहावं. आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हात त्याला आकार देतात, ती खरी भक्ती. आई आपल्या मुलाला गोंजारते ती भक्ती. एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गाताना पाहावं, ती भक्ती. अहो, ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाच, काम झाल्यावर एक नारळ फोडीन, अशी लालूच दाखवता. सृष्टीच्या निर्मात्याला चार िंभतींच्या आत कोंडता, कसा रे माणसा? भक्तीच्या सीमा त्यापलीकडच्या आहेत, किंबहुना भक्तीला सीमाच नाही. भक्तीच्या सीमा ठरवायला जातो व आपण फसतो.
 
जेव्हा भक्ती अन्नात शिरते, ती प्रसाद बनते व त्या प्रसादाचं माहात्म्य कितीतरी लोकांच्या मुखाचा घास होतो. भक्ती म्हणजे ईश्वराविषयीचा प्रेमभाव. एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एकदा चक्र सुरू झाले की, बाकीची चक्रे फिरतात तसेच मनाचे. मनाची शक्ती काम करू लागली की इतर शक्ती हालचाल करतात. मनाची शक्ती ताब्यात आणणे कठीण. जसा सर्व पदार्थांनी युक्त मसाला तयार करतात त्याप्रमाणे भगवंतप्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंत:करण आणि भगवंताचे नामस्मरण, हा त्रिवेणी संगम झाला की, भक्ती शरीरातच प्रवेश करते व कारुण्ययुक्त संवेदनशील, निरागसता, सरळपणा, सर्व चांगल्या गोष्टींनी युक्त एक निखालस भक्त, पवित्र आणि मांगल्याचा भास असलेला प्रामाणिकपणा, धार्मिक आचार भावना, नीतीने वर्तन करणारा, सुखी भक्त, द्वेष-मत्सर नसलेला, भगवंताला न विसरणारा, मनात येणारे भलतेसलते विचार नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय, मन गुंतले की भगवंताचे स्मरण, अनुसंधान हवे. योग आणि भक्ती. गीता तरी काय शिकविते, तरलाच मानव.