आकोटमध्ये तापमान ४७ अंशांवर
   दिनांक :27-Apr-2019
अकोल्याचा विक्रम मोडला
पावसाळ्यात वृक्षारोपणाचा अकोटवासिंचा संकल्प
 
अकोट - सध्या अकोला जिल्ह्यातील शहरांमध्ये सर्वाधिक तापमानाबाबत चढाओढ सुरु आहे. एका दिवसांपूर्वी अकोला शहर ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जाहिर होताच आज अकोट शहरात दुपारी तीन वाजून २२ मिनीटांनी ४७ अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाल्याने अकोल्याचा हा विक्रम मोडीत निघाला.या अभूतपूर्व उष्णतेने नागरिक होरपळले आहेत.
 
 
हे आजवरचे सर्वाधिक तापमान असल्याचे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. या तापमानामुळे नागरिकांना झाडांची आठवण प्रकर्षाने झाली असून त्यांनी येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचा संकल्प सोशल मिडियावरुन जाहिर देखील करुन टाकला. काही वर्षापासून अकोट शहरात विकासाच्या नावाखाली वृक्ष कापण्याचे कार्य सुरु आहे.शहरातील प्रमुख रस्त्याचे निर्मिती कार्य करतांना १०० पेक्षा जास्त झाडे कापण्यात आली.त्या मध्ये ५० ते ६० वर्ष वय असलेली हिरवीगार झाडेसुध्दा कापण्यात आली. रस्ता अर्धवट तयार करण्यात आला. त्या रस्त्याचा वापरही सुरु झाला. परंतू त्या रस्त्यालगत वृक्षारोपण मात्र करण्यात आले नाही.
 
त्यानंतर या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक गाठल्याने झाडे नसलेला रस्ता तीव्र उष्णतेमुळे निर्मनूष्य झाला. हीच परिस्थिती इतर रस्त्यांचीही आहे. अकोट नगरपरिदेअंतर्गत मध्यंतरीच्या काळात रस्तेच तयार करण्यात आले नाहीत; तर वृक्षारोपण कुठून करणार. वृक्षारोपण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाही सुस्तावल्या आहेत. यंदा उन्हाळ्यात शहरात पाणपोयाही फारशा दिसल्या नाहीत. काही दुकानदारांनी मात्र त्यांच्या दुकानासमोर पथिकांसाठी आर.ओ.च्या कँन्समधले थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. थंड पाण्याच्या बाटल्या,शितपेय यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. उष्णतामानासोबतच विवाहाचा हंगाम असूनही पैसे नसल्याने कुलर व फ्रिजची विक्री मंदावल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली. टरबुजं-खरबुजं यांची विक्री रविवारच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसून आले. आरोग्यदायी उसाचा रस,नींबू शरबत यांचीही रेलचेल आहे .शहरात जिथे झाडं तिथेच पार्किंग दिसून आले.