ऐसा प्रसंग ओढवला...
   दिनांक :27-Apr-2019
कहत कबीरा 
डॉ. शैलजा रानडे
9420370840
 
 
भागवत पुराणामध्ये एक प्रसंग वर्णन केला आहे की, समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या, त्यामुळे द्वारका समुद्रात बुडणार, हे भगवान श्रीकृष्णाने ओळखले आणि त्यांनी यादवांसह द्वारकेचा त्याग केला. ते प्रभास तीर्थक्षेत्रावर आले. तेथे यादवांनी यथेच्छ मद्यप्राशन केले आणि त्यांचे आपसातच भांडण सुरू झाले. भांडणाचा परिणाम मारामारीत आणि मारामारीचा परिणाम शस्त्राने परस्परांवर आघात हा झाला. यादवी माजली आणि यदुकाळाचा नाश झाला. आणि त्याचे कारण महर्षी व्यास सांगतात- ‘मद्यं कुलविनाशकम्‌।’ मद्य कुळाचा नाश करणारे असते.
 
संत कबीरांनीसुद्धा आपल्या अवतीभोवतीच्या समाजामध्ये मद्यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होताना बघितली. व्यक्ती व्यसनाधीन होऊन दुराचारी होताना बघितल्या. म्हणून समाजातील लोकांना सावध करण्यासाठी ते मद्याचे अवगुण सांगतात-
 
अवगुण कहुं शराब का, आपा अहमक होय।
मानुष से पशुआ भया, दाम गांठ से खोय।।
 
या दारूचा अवगुण काय सांगू? या दारूमुळे मनुष्य मूर्ख, अहंकारी होतो. मनुष्याचं रूपांतर पशूत होते आणि गाठीशी जोडलेला पैसापण दारूपायी उधळला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’त दारूच्या व्यसनावर चांगले कोरडे ओढले आहेत. ते म्हणतात-
मजूर कष्टाने पैसा मिळविती।
तो हि दारूपायी उधळिती।
मुलाबाळा उपवास पडती।
होय दुर्गति जीवनाची।
लोळे गटारात अमीरही।
कोणीही कोणास मारूनि देई।
मुलीबाळी सुरक्षित नाही।
ऐसा प्रसंग ओढवला।
 
देव-दानवांनी समुद्रमंथन केले. त्यातून निघालेल्या अनेक गोष्टींमध्ये ‘सुरा’- ‘मद्या’चाही समावेश होतो. ती सुरा असुरांनी स्वीकारली. त्यामुळे असुरांचे पेय म्हणजे मद्य. ती पिणारी व्यक्तीही असुरासारखीच दुर्जन, दुराचारी होते.
राम गणेश गडकर्‍यांनी ‘एकच प्याला’ हे नाटक लिहिले. दारूच्या व्यसनामुळे सुधाकरासारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस आपला स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकर्‍यांनी अत्यंत प्रभावी भाषेत मांडली. राष्ट्रसंतांची लेखणी ही केवळ ईश्वराची स्तुती करण्यासाठी नसते, तर ती समाजप्रबोधनासाठीसुद्धा चालते. कारण- ‘बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणूनी कळवळा येत असे।’ असा त्यांचा स्वभाव असतो.