पक्षविरोधी काम करणार्‍यांवर निवडणुकीनंतर कारवाई- अशोक चव्हाण
   दिनांक :27-Apr-2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात काम करणार्‍या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला. मुंबई येथे आज कॉंग्रेसची पत्रकार परिषद झाली. यावेळी कॉंग्रेस नेते पी. चिदम्बरम्‌ देखील उपस्थित होते.
 

 
 
 
अशोक चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला चार महिने शिल्लक आहेत. त्याअगोदरच पक्षाविरोधात काम करणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पक्षाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर विखेंनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. विशेष असे की, शुक्रवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेर येथे प्रचारसभा असतानाही विखे शिर्डीमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते. चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल भाष्यही केले. ते म्हणाले की, नितेश राणे, कालिदास कोळंबकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्ष सोडल्यामुळे फरक पडणार नाही. कॉंग्रेस खूप मजबूत आहे. पक्षाविरोधात काम कारणार्‍यांविरोधात अशोक चव्हाण आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले.